म्हणे... सरपंच व्हायचय मला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 04:59 PM2017-09-27T16:59:27+5:302017-09-27T17:01:52+5:30
उंडाळे : सध्या कºहाड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सरपंच पदासाठी अर्ज भरण्यासही प्रारंभ झाला आहे. यामध्ये हणमंतवाडी ग्रामपंचायतीमध्ये सध्या सरपंचपद हे इतर मागासवगीय पुरूष यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी अनेकांनी कंबर कसलेली दिसून येतेक़ काहीजण जरतर गुडघ्याला बाशिंगच बांधून बसले आहेत.
हणमंतवाडी येथील निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले दिसून येते. येथील लोकसंख्या सुमारे चारशेच्या घरात आहे. हणमंतवाडी, कुंभारवाडा हे वॉर्ड यामध्ये येतात. एकूण सात सदस्यांची ग्रामपंचायत आहे. येथील निवडणूक ही नेहमीच बिनविरोध होत असल्याने खेळीमेळीचे वातावरण असते. यंदा मात्र, चित्र वेगळेच पहायला मिळत आहे.
सरपंच पद हे थेट जनतेतून निवडून येत असल्याने अनेकांना सरपंच पदाचे डोहाळे लागल्याचे दिसून येतेय. यामध्ये सरपंच पदासाठी इच्छुक असणारे अर्जुन सुतार आणि दुसरे रत्नाप्पा कुंभार यांनी आपापले गट राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर तरूण नितीन मोरे हे सुद्धा इच्छुक असून यांनी सुद्धा सदस्य पदासाठी फिल्डींग लावली आहे. एकूणच या ग्रामपंचायतीमध्ये कमी लोकसंख्या असल्याने कोण कोणाच्या बाजूने कौल देणार हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे.
मात्र, सरपंच पद हे थेट जनतेतून असल्याने प्रत्येकाने केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊनच सुज्ञ मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे मोदी सरकारने घेतलेल्या सरपंचपदाचा निर्णय ग्रामीण भागात कितपत यशस्वी होईल हे मात्र, उत्सुकतेचे ठरेल.