महाबळेश्वरचे तापमान १२ अंशावर, साताऱ्याच्या तापमानातही सातत्याने उतार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 06:01 PM2022-12-02T18:01:06+5:302022-12-02T18:01:29+5:30
मागील तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला होता
सातारा : जिल्ह्यातील किमान तापमान वाढल्याने उकाडा जाणवत होता. पण, तीन दिवसांपासून पारा घसरु लागला आहे. गुरुवारी तर साताऱ्यात १६ तर महाबळेश्वरचे १२ अंशावर तापमान होते. यामुळे हळू-हळू थंडीत वाढ होत असल्याचे जाणवू लागले आहे.
जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून थंडीचे आगमन झाले आहे. पण, हिवाळा ऋतु असूनही थंडीची तीव्रता जाणवत नाही. त्यातच अनेकवेळा तापमानात सतत चढ-उतार सुरु असतो. आठवड्यापूर्वी गारठा वाढला होता. त्यावेळी सातारा शहराचे किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आले होते. तर थंड हवेच्या महाबळेश्वरचे तापमान १० अंशापर्यंत घसरले होते.
दोन दिवस तापमानात एकदम उतार आल्यानंतर पारा पुन्हा वाढला. सातारा शहराचा तर २१ अंशावर पोहोचला होता. यामुळे थंडी गायब होऊन उकाडा जाणवत होता. तर महाबळेश्वरचाही पारा १७ अंशापर्यंत गेलेला. त्यामुळे हिवाळी ऋतु असूनही लोकांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. असे असतानाच मागील तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे.
जिल्ह्याचा पारा हळूहळू कमी होत चालला आहे. सोमवारी सातारा शहराचे किमान तापमान २१.०३ अंश होते. तर मंगळवारी २०.०६ अंशाची नोंद झाली. बुधवारी १९.०३ तर गुरुवारी १६.०६ अंशापर्यंत तापमान कमी झाले. त्याचबरोबर महाबळेश्वरचा पाराही कमी होत चालला आहे. यामुळे हळू-हळू थंडी वाढताना दिसून येत आहे