‘तहसील’च्या नव्या इमारतीत जीर्णाेद्धारीत मंदिर
By admin | Published: October 25, 2015 09:13 PM2015-10-25T21:13:43+5:302015-10-25T23:48:51+5:30
सामोपचाराने वाद मिटला : उजव्या बाजूस मंदिर उभारण्याचा निर्णय
कऱ्हाड : येथील तहसील कार्यालयाची जुनी इमारत पाडून त्याठिकाणी नवी इमारत उभारण्याचे काम गतीने सुरू आहे. त्यासाठी रविवारी जुन्या इमारत परिसरात असणाऱ्या मंदिरातील हनुमानाची मूर्ती हलवण्याचा विधी आयोजित केला होता. यावेळी संबंधित मंदिर नवीन इमारतीमध्ये कोठे असावे, याबाबत सकारात्मक चर्चा झाली. अखेर नव्या इमारतीत पूर्वीसारखेच हनुमान मंदिर उभारण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यामुळे या वादावर पडदा पडला.
शहरातील तहसील कार्यालयाची जुनी इमारत पाडून त्याठिकाणी सर्वसोयीनियुक्त नवीन इमारत उभारण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जुन्या इमारत परिसरातील मंदिर हटवून नवीन इमारतीत मंदिर उभे करताना सर्वांनाच विश्वासात घ्यावे, अशी भूमिका या संघटनांनी घेतली. मंदिर कोठे व कसे बांधणार, हे प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणीही संघटनांच्या वतीने करण्यात आली. त्यावेळी तहसीलदार राजेंद्र शेळके, नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. जुन्या मंदिराप्रमाणेच नवीन मंदिर बांधण्यात येईल. ते मंदिर नव्या इमारतीच्या उजव्या बाजूस असेल व मंदिराला पूर्वीप्रमाणेच सर्व सोयीसुविधा देण्यात येतील, असा खुलासा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. त्यामुळे नव्या जागेत जीर्णाेद्धारीत हनुमान मंदिर उभारण्यासाठीचा धार्मिक विधी अखेर शांततेत पार पडला.
यावेळी हिंदू एकता आंदोलनचे विनायक पावसकर, मनसेचे सागर बर्गे, अनिल घराळ, महेश जगताप, शरद देव, गोरख शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)