सेवागिरी महाराजांचे मंदिर आज दर्शनासाठी बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:40 AM2021-01-13T05:40:24+5:302021-01-13T05:40:24+5:30
पुसेगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव (ता. खटाव) येथील सेवागिरी महाराजांचा रथोत्सव धार्मिक विधी व परंपरेनुसार साध्या ...
पुसेगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव (ता. खटाव) येथील सेवागिरी महाराजांचा रथोत्सव धार्मिक विधी व परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. तसेच सेवागिरी महाराज संजीवन समाधी मंदिर मंगळवार, दि. १२ रोजी दिवसभर दर्शनासाठी बंद राहणार आहे. भाविकांच्या आरोग्याच्या काळजीपोटी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने हा निर्णय घेतला असून, भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.
ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार भाविकांना रथोत्सवाच्या दिवशी केले जाणारे धार्मिक विधी व सुवर्णमंडित समाधीचे लाइव्ह दर्शन ट्रस्टचे अधिकृत फेसबुक पेज ‘प. पू. श्री सेवागिरी महाराज तीर्थक्षेत्र सुवर्णनगरी, पुसेगाव व यू-ट्यूब चॅनलवर घेता येणार आहे.
पुसेगाव येथील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी तात्पुरता बदल करण्यात आला आहे. सातारा बाजूकडून दहिवडीकडे जाणारी वाहने पुसेगाव भागात न जाता नेर, राजापूर, कुळकजाई मार्गे दहिवडीकडे जातील. दहिवडीकडून येणारी वाहने कटगुण, खटाव, खातगुण, जाखणगाव, औंध फाटा, विसापूर मार्गे साताऱ्याकडे जातील. वडूज बाजूकडून फलटणकडे जाणारी वाहने पुसेगावात न येता खटाव, जाखणगाव, औंध फाटा, नेर, ललगुण मार्गे फलटणला जातील, तर फलटणकडून वडूज बाजूकडे जाणारी वाहने ललगुण, नेर, औंध फाटा, जाखणगाव खटाव मार्गे वडूजकडे जातील. दहिवडी ते डिस्कळ जाणारी व येणारी वाहतूक निढळ, मलवडी, राजापूर मार्गे सुरू राहील, अशी माहिती पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस विश्वजित घोडके यांनी दिली.
यावेळी विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, सुरेशशेठ जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव उपस्थित होते.
(चौकट)
श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त भाविकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करून कोरोना रोखण्यासाठी सहकार्य करावे. पुसेगावात जमावबंदी आदेश जारी करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी तसेच भाविकांनी येण्याचा प्रयत्न करू नये.
- विश्वजित घोडके,
सहायक पोलीस निरीक्षक
फोटो : सेवागिरी महाराज