शेतकऱ्यांचे पैसे पाहून टेम्पोचालकाची नियत फिरली, मित्रांच्या मदतीने १८ लाखांची रोकड लुटली
By दत्ता यादव | Published: December 6, 2023 11:41 PM2023-12-06T23:41:09+5:302023-12-06T23:42:40+5:30
सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या टीमने अवघ्या दोन दिवसांत या लुटीचा पर्दाफाश करून तिघांच्या मुसक्या आवळल्या.
सातारा : पुणे जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांचा कांदा घेऊन टेम्पोचालक बेळगावला गेला. कांदा विक्रीतून शेतकऱ्यांकडे आलेली १८ लाखांची रोकड पाहून टेम्पोचालकाची नियत फिरली. त्याने आपल्या सहकारी मित्रांना याची टीप दिली. ठरल्याप्रमाणे त्याने लुटीचा कट तडीसही नेला. मात्र, सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या टीमने अवघ्या दोन दिवसांत या लुटीचा पर्दाफाश करून तिघांच्या मुसक्या आवळल्या.
गणेश मच्छिंद्र ताकवणे (वय २८), अजय भारत भोले (२५, दोघेही रा. पारगाव, ता. दाैंड, जि. पुणे), अन्सार उस्मान शेख (२१, रा. नांदगाव, ता. दाैंड, जि. पुणे), अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहा शेतकरी टेम्पो भाड्याने घेऊन कांदा विक्रीसाठी २ डिसेंबरला बेळगावला गेले होते. कांदा विक्रीतून त्यांना १८ लाख ६० हजार रुपये मिळाले. हे पैसे घेऊन सर्वजण ३ डिसेंबरला रात्री बेळगावहून आपल्या घरी निघाले.
शेतकऱ्यांकडे असलेली ही मोठी रक्कम पाहून टेम्पोचालक गणेश ताकवणे याची नियत फिरली. त्याने टेम्पो चालवतच ही रोकड लुटण्याचा कट रचला. अजय भोले, अन्सार शेख या आपल्या दोघा मित्रांना त्याने फोन करून टेम्पो कुठे आहे, तुम्ही नेमकं काय करायचं, याची सारी माहिती दिली. ठरल्याप्रमाणे अन्सार आणि अजय हे दोघे दुचाकीवरून साताऱ्याकडे आले. शेंद्रेजवळ चढावर टेम्पो असताना चालत्या टेम्पोमध्येच गणेश ताकवणेने सीटखालील पैशाची बॅग अजयच्या हातात दिली. त्यावेळी टेम्पोतील शेतकरी गाडीत झोपले होते.
टेम्पो वाढे फाट्यावर आल्यानंतर काही जण चहा पिण्यासाठी खाली उतरले. त्यावेळी हातचलाखी करून गणेशने दुसरी पैशाची पिशवीही मित्रांच्या हातात दिली, अशा प्रकारे एकूण १८ लाख ६० हजारांची रोकड त्यांनी गायब केली. हा गुन्हा सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने या तपासाला सुरुवात केली. टेम्पोचालक गणेश ताकवणे याला पोलिसांनी चाैकशीसाठी बोलावले. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून विसंगती आढळून आली. त्यामुळे पोलिसांचा संशय त्याच्यावर अधिकच बळावला. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने लुटीचा कट रचल्याने कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या दोन मित्रांना दाैंड येथे जाऊन अटक केली. त्यांच्याकडून लुटीतील १७ लाख ९९ हजारांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली.
सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजित भोसले, नीलेश जाधव, पंकज माेहिते, संतोष घाडगे, रोहित पवार, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष कचरे, सुशांत कदम यांनी या कारवाईत भाग घेतला.
चाैकट : 'त्याचा' रुबाब तो मी नव्हेच...
टेम्पोचालक गणेश ताकवणे हा फिर्यादी शेतकऱ्यांसोबत तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आला होता. तेव्हा त्याचा रुबाब म्हणजे तो मी नव्हेच असा होता. शेतकरी बोलत असताना मध्येच तो हुशारी दाखवत होता. इथेच पोलिसांना त्याचा संशय आला आणि त्याची उलटतपासणी सुरू झाली. त्यातच तो अलगद जाळ्यात सापडला.