सालपे घाटात चाळीस फूट दरीत कोसळलेला टेम्पो; जखमी चालकास पोलीसांच्या कार्यतत्परतेने दिले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 09:08 PM2024-01-16T21:08:56+5:302024-01-16T21:09:05+5:30
आपल्याला कोणी तरी बाहेर काढावे म्हणून जिवाच्या आकांताने त्या अंधारात ओरडत होता. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहन धारकाने याची माहीती लोणंद पोलीसांना देताच लोणंद पोलीसांची टीम घटनास्थळी दाखल झाली.
संतोष खरात/ लोणंद - पुणे सातारा रोडवर दि. १६ रोजी सालपे घाटात केनॉल जवळ रात्रीच्या सुमारास टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने चालकासह टेम्पो पुलाचे कठडे तोडून सुमारे चाळीस ते पन्नास फूट खाली कालव्याच्या मोठ्या दगडात कोसळला. यामध्ये टेम्पो चालक गंभीर जखमी झाला होता. आपल्याला कोणी तरी बाहेर काढावे म्हणून जिवाच्या आकांताने त्या अंधारात ओरडत होता. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहन धारकाने याची माहीती लोणंद पोलीसांना देताच लोणंद पोलीसांची टीम घटनास्थळी दाखल झाली.
जखमी अवस्थेत टेम्पोत अडकलेल्या त्या चालकास प्रथम बाहेर काढण्याचे मोठे अवाहन लोणंद पोलीसांसमोर होते. त्या भयानक अंधारात आणि कडाक्याच्या थंडीत लोणंद पोलीसांनी तत्परता दाखवत दोन क्रेन बोलविण्यात आल्या. या दोन क्रेनच्या साह्याने लोणंद पोलीसांची टीम दरीत उतरली. आयशर टेम्पो दोन मोठ्या दगडात अडकला होता. चालक जखमी अवस्थेत ओरडत होता. अंधाऱ्या रात्री बॅटरीच्या मदतीने मोठया तीन तासाच्या प्रयत्नानंतर गाडीचा दरवाजा तोडून प्रथम चालक सुमित पांडूरंग गावड रा. पन्हाळा, जि. कोल्हापूर यास बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याने या जखमी चालकास लोणंद पोलीसांनी जिवदान दिले आहे.
यामध्ये लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, पोलीस हवालदार अतुल कुंभार, सर्जेराव सुळ, पोलीस कॉन्स्टेबल संजय चव्हाण, वाघमोडे, पोलीस पाटील शांताराम पाटील, पोलीस मित्र सागर शेळके, धनंजय धायगुडे , सुजित धायगुडे, अनिकेत कोळपे, महेश बिचुकले यांच्या तीन तासाच्या अथक परिश्रमामुळे जखमी अवस्थेत अडकलेल्या टेम्पो चालकास बाहेर काढून वैद्यकिय उपचारासाठी पाठवणे शक्य झाल्याने जखमी टेम्पो चालक युवकास जीवदान मिळाले असून या सर्वांचे सर्वच स्थरातून अभिनंदन होत आहे.