ऊसवाहू ट्रॅक्टर-ट्रॉलीला टेम्पोची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 07:07 PM2019-12-26T19:07:15+5:302019-12-26T19:10:22+5:30
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाटेश्वरनगर येथे भरधाव चाललेल्या टेम्पोने ऊस वाहतूक ट्रॅक्टर-ट्रॉलीस पाठीमागून धडक दिली. अपघातात दोन्ही वाहने महामार्गावरच ऊलटी झाल्याने मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. हा अपघात बुधवारी दुपारी झाला.
नागठाणे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाटेश्वरनगर येथे भरधाव चाललेल्या टेम्पोने ऊस वाहतूक ट्रॅक्टर-ट्रॉलीस पाठीमागून धडक दिली. अपघातात दोन्ही वाहने महामार्गावरच ऊलटी झाल्याने मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. हा अपघात बुधवारी दुपारी झाला.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन महामार्गावरून कऱ्हाड बाजूने सातारा मार्गावरील अजिंक्यतारा कारखान्याकडे ऊस घेऊन निघाला होता. दुपारी दोन वाजता पाटेश्वरनगर (बोरगाव) येथे आला असता गोव्याहून पुण्याला प्लास्टिक भंगार घेऊन भरधाव निघालेल्या टेम्पोने त्यास पाठीमागून जोराची धडक दिली, ही धडक इतकी जोरात होती की उसाने भरलेली एक ट्रॉली व टेम्पो ही दोन्ही वाहने महामार्गावरच पलटी झाली.
या अपघातात टेम्पो चालक विकास आनंदराव धुमाळ (वय २९, रा. सोनके, ता. कोरेगाव) हा किरकोळ जखमी झाला. त्यास इतर वाहनचालकांनी केबीनमधून बाहेर काढून नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र्रात दाखल केले. ट्रॉली आणि मालट्रक महामार्गावरच ऊलटी झाल्याने सर्वत्र ऊस पसरला असल्याने मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास पूर्णपणे ठप्प झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच बोरगाव पोलीस स्टेशनचे हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम तसेच महामार्ग विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काही काळ बोरगाव सेवारस्त्यावरून वाहतूक वळवून दिली. तद्नंतर महामार्गावर ऊलटी झालेली वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करून वाहतूक पूर्ववत करून दिली. या अपघाताची बोरगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार मनोहर सुर्वे तपास करत आहेत.