कऱ्हाडच्या वाहतूक व्यवस्थेत आज तात्पुरता बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:26 AM2021-07-01T04:26:36+5:302021-07-01T04:26:36+5:30
कृष्णा कारखान्याची मतमोजणी कऱ्हाड येथील राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये होणार आहे. त्यामुळे परिसरातील वाहनधारक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून ...
कृष्णा कारखान्याची मतमोजणी कऱ्हाड येथील राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये होणार आहे. त्यामुळे परिसरातील वाहनधारक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशानुसार व उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या सूचनेनुसार वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार कार्वे नाका ते भेदा चौक जाणारा रस्ता एसटी व अवजड वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात येणार असून, दुचाकी, चारचाकी, रिक्षा या लहान वाहनांसाठी हा रस्ता बंद राहणार आहे. या मार्गावरील कार्वे नाका मार्गे कऱ्हाड शहरात येणारी वाहने मुजावर कॉलनी येथून ईदगाह मैदानमार्गे कामगार चौकाकडे जातील, तर मतमोजणीच्या अनुषंगाने शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची वाहने जुने तहसील कार्यालय मैदानात पार्किंग करण्यात येणार आहेत, तसेच मतमोजणीच्या अनुषंगाने येणाऱ्या नागरिकांची सर्व प्रकारची वाहने वरद मेडिकलसमोरील मैदानात पार्क करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतमोजणीच्या ठिकाणी शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशिवाय फक्त उमेदवार व त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांना ओळखपत्र असतील तरच मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. अन्य कोणालाही येथे थांबता येणार नाही किंवा वाहने पार्क करता येणार नाहीत. तसा कोणी प्रयत्न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याबाबत कारवाई करून गुन्हे दाखल करीत वाहने जप्त केली जातील, असा इशाराही देण्यात आला आहे.