हंगामी शिक्षकांना धास्ती..!
By Admin | Published: March 27, 2015 10:47 PM2015-03-27T22:47:08+5:302015-03-27T23:57:50+5:30
सातारा पालिका : गेल्या वर्षाचा पगार नाही; यंदा तरी मिळणार का?, शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था
सातारा : नगर पालिकेच्या शाळेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी नगर पालिकेने नव्याने सुरू केलेल्या सेमी इंग्रजी व प्ले गु्रप संकल्पनेला पालकांकडून प्रतिसाद मिळाला असला तरी या शिक्षण प्रणालीसाठी नव्याने घेतलेल्या हंगामी शिक्षकांचे आजअखेर गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याचा पगार मिळाला नाही. त्यामुळे चालू वर्षाच्या एप्रिल महिन्याचे काम करायचे की नाही, या संभ्रमावस्थेत शिक्षक आहेत.स्पर्धात्मक युगात पालिका व जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या खालावली जात आहे. यासाठी शाळेची गुणवत्ता वाढविण्याच्या हेतूने गेल्या वर्षापासून सातारा पालिकेने ‘प्ले गु्रप’ व ‘सेमी इंग्रजी’ सुरू केली आहे. त्यानुसार पालिकेच्या पाच शाळांमध्ये ‘प्ले गु्रप’ व पाच शाळांमध्ये ‘सेमी इंग्रजी’ सुरू करण्यात आले आहे. यासाठी ‘प्ले गु्रप’मध्ये पाच शिक्षिका व पाच सेविका तर सेमी इंग्रजीसाठी स्वतंत्र हंगामी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी यातील काही हंगामी शिक्षकांनी एप्रिल महिन्यातही शाळेचे कामकाज केले. तरीदेखील एप्रिल महिन्यात केलेल्या कामाचा मोबदला आजअखेर त्या शिक्षकांना मिळालाच नाही. याबाबत काही शिक्षकांनी पालिकेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता मार्च अखेरच तुमचे टेंडर असल्याचे सांगण्यात आले. तर काहीजण पगार मिळण्याची शिक्षकांना हमी देत आहेत. यंदा चालू वर्षाचा जूनपासूनचा पगार मिळाला असला तरी गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याचा पगार अद्याप मिळाला नसल्याने पुढील महिन्यात काम करायचे की नाही, असा प्रश्न या हंगामी शिक्षकांना पडला आहे.याबाबत पालिकेने मात्र आळीमिळी गुपचिळीची भूमिका घेतली आहे. याविषयी आपली भूमिका नगरपालिका स्पष्ट करत नसल्याने एप्रिल महिन्याची जबाबदारी कोण घेणार, असाही यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेच्या या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्यामुळे पालक वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे टेंडर असेल तरच हंगामी शिक्षक काम करण्यास इच्छुक असून, गेल्या वर्षीचा एप्रिल महिन्याचा पगार मिळाला तरच पुढील महिन्यात काम करण्याचा निर्णय त्या शिक्षकांनी घेतला आहे.पालिकेने हंगामी शिक्षकांचा पगार देऊन मुलांचे होणारे नुकसान टाळावे, अशी अपेक्षा पालकांमधून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
संबंधित शिक्षकांनी थेट माझ्याकडे येऊन आपले म्हणणे मांडावे. गेल्या वर्षीचा एप्रिल महिन्याचा पगार नेमका कोणत्या कारणामुळे रखडला आहे, हे पाहून पुढील कारवाई करू .
- आशिष लोकरे, अतिरिक्त मुख्याधिकारी, सातारा पालिका