साताऱ्याचा पारा नीच्चांकी; १२ अंशाखाली घसरला, हुडहुडी वाढली
By नितीन काळेल | Published: January 19, 2024 01:30 PM2024-01-19T13:30:56+5:302024-01-19T13:31:20+5:30
शीतलहर कायम; महाबळेश्वरही गारठले
सातारा : जिल्ह्याचा पारा मागील पाच दिवसांपासून घसरत असून शुक्रवारी साताऱ्यात ११.९ किमान तापमानाची नोंद झाली. हे या वर्षातील नीचांकी तापमान ठरले आहे. तर वातावरणात शीतलहर कायम असल्याने नागरिकांना हुडहुडी भरुन येत आहे. त्याचबरोबर थंड हवेचे महाबळेश्वरही गारठले आहे.
जिल्ह्यात यावर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण कमी होते. मात्र, डिसेंबरच्या मध्यानंतर काही दिवस पारा १३ अंशापर्यंत खाली आला होता. तर थंड हवेच्या महाबळेश्वरचे किमान तापमानही १२ अंशापर्यंत खाली आले होते. काही दिवसच पारा घसरला. पण, त्यानंतर तापमान वाढत गेले. परिणामी यंदा थंडीची तीव्रता कमी राहण्याचा अंदाज बांधला जात होता. मात्र, मागील पाच दिवसांपासून किमान तापमानात सतत उतार येत गेला आहे. त्यातच उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची लाट आलेली आहे. बर्फवृष्टी होत आहे. यामुळे तेथील जनजीवनावर परिणाम झाला आहे. तशीच परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. कारण, उत्तरेकडून थंड वारे वाहत आहेत. यामुळे जिल्ह्यातही शीतलहर आहे. त्यामुळे अंगाला थंडगार वारे झोंबत आहे. परिणामी नागरिकांना ऊबदार कपड्यांचा वापर करावा लागत आहे. जिल्ह्याचा पारा घसरल्यामुळे बाजारपेठ तसेच शेतीच्या कामावरही परिणाम झालेला आहे. यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातही शेकोट्या पेटविण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सातारा शहराच्या पाऱ्यातही घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच १८ अंशापर्यंत असणारे किमान तापमान चार दिवसांपासून घसरले आहे. त्यातच शुक्रवारी ११.९ अंश किमान तापमानाची नोंद झाली. हे या वर्षातील नीच्चांकी तापमान ठरले. तर या कडाक्याच्या थंडीने सकाळच्या सुमारास फिरणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरचा पाराही घसरला आहे. १२ अंशादरम्यान तापमान राहत आहे.
सातारा शहरात नोंद किमान तापमान...
दि. ४ जानेवारी १६.५, ५ जानेवारी १७.२. ६ जानेवारी १७.५, ७ जानेवारी १७.२. दि. ८ जानेवारी १६.६, ९ जानेवारी २०.२, १० जानेवारी १८.१, दि. ११ जानेवारी १७.४, १२ जानेवारी १६.१, १३ जानेवारी १५.५, १४ जानेवारी १५.८, दि. १५ जानेवारी १४.५, १६ जानेवारी १२.४, १७ जानेवारी १३, १८ जानेवारी १२, दि. १९ जानेवारर ११.९