दुर्मीळ जखमी घुबडावर दहा टाक्यांची शस्त्रक्रिया. वाईतील प्राणीमित्रांमुळे मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:08 PM2018-07-11T13:08:04+5:302018-07-11T13:11:45+5:30
जखमी अवस्थेत आढळलेल्या एका दुर्मीळ घुबडाला येथील प्राणीमित्रांमुळे जीवदान मिळाले. या घुबडावर चक्क दहा टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली असून, कात्रज येथील राजीव गांधी प्राणी अनाथालयात पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. याठिकाणी घुबडावर दोन महिने उपचार केले जाणार आहेत.
वाई : जखमी अवस्थेत आढळलेल्या एका दुर्मीळ घुबडाला येथील प्राणीमित्रांमुळे जीवदान मिळाले. या घुबडावर चक्क दहा टाक्यांची
शस्त्रक्रिया करण्यात आली असून, कात्रज येथील राजीव गांधी प्राणी अनाथालयात पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. याठिकाणी घुबडावर दोन महिने उपचार केले जाणार आहेत.
वाई औद्योगिक वसाहतीतील एका संरक्षण कठड्यावर मासेमारी करणारे एक दुर्मीळ घुबड पर्यावरणप्रेमी डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांना जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधून जखमी घुबडाला वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांच्या ताब्यात दिले.
यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील देशपांडे, डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी घुबडावर उपचार सुरू केले. या घुबडावर दहा टाक्यांचे आॅपरेशन करण्यात आले. मासेमारी करण्यासाठी दबा धरून बसले असता संरक्षण भिंतीच्या तारेत पंख अडकल्याने हे घुबड जखमी झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
पंखांच्या हाडांना गंभीर दुखापत झाल्याने घुबडाला पुढील उपचारासाठी राजीव गांधी प्राणी अनाथालय, कात्रज (पुणे) येथे हालविण्यात आले आहे. त्याच्या पंखांचा एक्सरे काढण्यात आला असून, त्याच्यावर या अनाथालयात किमान दोन महिने उपचार केले जाणार आहेत. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात येणार आहे.
वाई येथे जखमी अवस्थेत आढळून आलेल्या दुर्मीळ घुबडावर कात्रज येथील अनाथालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. हे दुर्मीळ प्रजातीचे घुबड असून, याला इंग्रजीत नाव ब्राऊन फिश ओवल तर मराठीत तपकिरी मत्स्य घुबड म्हणतात. कोकणात याला हुमन या नावाने ओळखले जाते. हा घुबड छोटे पाणवठे, ओढे-नाले येथे मासेमारी करून उदरनिर्वाह करतो. भात शेती परिसरातही याचा अधिवास
असतो. या घुबडाचे संवर्धन होणे गरजेचे आहे.
- महेश झांजुर्णे,
वनक्षेत्रपाल, वाई