नाडे गावात दहा दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:39 AM2021-04-21T04:39:04+5:302021-04-21T04:39:04+5:30
रामापूर : कोरोना रोखण्यासाठी पाटण तालुक्यातील नाडे नवारस्ता (ता. पाटण) येथील व्यापारी व ग्रामस्थांनी दहा दिवस ‘जनता कर्फ्यू’चा एकमुखी ...
रामापूर : कोरोना रोखण्यासाठी पाटण तालुक्यातील नाडे नवारस्ता (ता. पाटण) येथील व्यापारी व ग्रामस्थांनी दहा दिवस ‘जनता कर्फ्यू’चा एकमुखी निर्णय घेतला.
पाटण तालुक्यातील नाडे नवारस्ता येथील ग्रामसमितीने गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून केलेल्या प्रयत्नांमुळे एकही कोरोना रुग्ण नाही, मात्र नाडे नवारस्ता ही पाटण तालुक्यातील नावाजलेली व्यापारी पेठ असल्याने अत्यावश्यक खरेदीच्या निमित्ताने बाजारपेठेत गर्दी होत आहे. परिसरातील अनेक गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नाडे ग्रामपंचायत व ग्राम सुरक्षा समितीने ग्रामस्थ व व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन संभाव्य धोका लक्षात घेऊन दहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. दि. २१ ते ३० एप्रिलपर्यंत १० दिवस हा जनता कर्फ्यू असणार आहे. या जनता कर्फ्यूदरम्यान रुग्णालये, मेडिकल दुकानांव्यतिरिक्त सर्व प्रकारचे व्यवसाय बंद राहतील. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनवश्यक वस्तू पार्सल स्वरुपात घरपोच करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे.
ग्रामपंचायत व ग्राम समितीने बैठकीत घेतलेल्या नियमांचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई, दंड व दुकान सील करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजित पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, सरपंच विष्णू पवार, उपसरपंच अमित शिंदे, ग्रामविस्तार अधिकारी गणेश पवार, पोलीसपाटील नीलेश पाटील, सचिन भिसे, दिनकर माथणे, व्यापारी, ग्रामस्थ उपस्थित होते. नाडे नवारस्ता येथील ग्रामस्थांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन करून सर्व व्यापाऱ्यांनी व कामगारांनी लस घेतल्याशिवाय दुकाने न उघडण्याचे आवाहन करण्यात आले. व्यापारी व ग्रामस्थांनी सहकार्य करावे. अडचण निर्माण झाल्यास ग्रामपंचायत व ग्राम समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.