दहा दिवसांच्या बाप्पांना डॉल्बीमुक्त निरोप !
By admin | Published: September 14, 2016 10:06 PM2016-09-14T22:06:09+5:302016-09-15T00:02:43+5:30
गणेश भक्तांचा अलोट उत्साह : प्रशासनाची करडी नजर; आजच्या विसर्जन सोहळ्यासाठी कडक बंदोबस्त
सातारा : साताऱ्यासह कऱ्हाड, वाई शहरांमध्ये दहा दिवसांच्या घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींना निरोप देण्यात आला. सातारा शहरात डॉल्बीमुक्त मिरवणुका निघाल्या. ढोल-ताशे, लेझीम अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात साताऱ्याच्या संस्कृतीला शोभेल अशी मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील गणेश भक्तांनी गर्दी केली होती. सातारा शहरात बुधवारी २५ मोठ्या गणेशमूर्तींना निरोप देण्यात आला. गुरुवारी ७३ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे.
पालिका व पोलिस प्रशासनाची या मिरवणुकांवर करडी नजर होती. नियम तोडणाऱ्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना बुधवारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली. पालिकेने तयार केलेल्या प्रतापसिंह शेती फार्म, गोडोली बाग, हुतात्मा उद्यान, दगडी शाळा आदी ठिकाणच्या कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सार्वजनिक मंडळांची लगबग सुरू झाली असून, मंगळवारी शहरातील आठ मंडळांनी विजर्सन केले तर बुधवारी २५ मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप दिला. अनंत चतुर्दशीदिवशी गुरुवार, दि. १५ रोजी ७३ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे.
विसर्जन कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. एक अतिरिक्त पोलिस अधीक्षक, सात पोलिस उपअधीक्षक, २२ पोलिस उपनिरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक ८०, पोलिस कर्मचारी १७५७, होमगार्ड ५३५, एसआरपीएफचे दोन प्लाटून, दोन क्यूआरटी तुकडी, दोन आरसीपी आणि चार स्ट्रायकिंग फोर्सच्या तुकड्या असा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला होता.(प्रतिनिधी)
आज खरी कसरत
सातारा शहरातील बहुतांश सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन राधिका रस्त्यावर तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात होत आहे. पालिका कर्मचारी, पोलिस या ठिकाणी सेवा बजावत आहेत. अतिउत्साहात कोणी तलावात पडण्याची शक्यता असल्याने लाईफगार्ड नजर ठेवून आहेत. विसर्जनाचा (गुरुवार) मुख्य दिवस असल्याने हे कर्मचारी डोळ्यात तेल घालून विसर्जनस्थळी थांबणार आहेत
कऱ्हाडात बाप्पाची
थाटात मिरवणूक
कऱ्हाड : शहरात अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला बुधवारी सायंकाळी शहरातील काही छोट्या-मोठ्या गणेश मंडळांनी मोठ्या थाटामाटात गणेशमूर्तींचे विसर्जन केले. यावेळी कऱ्हाड पंचायत समितीमध्ये बसविण्यात आलेल्या गणेशमूर्तींचे कर्मचाऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत येथील कृष्णा नदीत विसर्जन केले. कऱ्हाडात नागरिकांनी ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ या उपक्रमास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.