दहा दिवसांची तान्हुली झुडपात सापडली
By admin | Published: February 28, 2015 11:57 PM2015-02-28T23:57:23+5:302015-02-28T23:59:47+5:30
कऱ्हाडातील घटना : पोलिसांनी घेतले ताब्यात, उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
कऱ्हाड : वारुंजी फाटा येथील एका मंगल कार्यालयानजीक उपमार्गापासून काही अंतरावर झुडपात दहा दिवसांची तान्हुली बेवारस स्थितीत आढळून आली. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्या तान्हुलीला ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली मंगल कार्यालयाच्या मागे झुडपांमधून एका लहान मुलाचा रडण्याचा आवाज सकाळी फिरणाऱ्या नागरिकांच्या कानी पडला. नागरिकांनी याबाबतची माहिती कऱ्हाड शहर पोलिसांत दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणची पाहणी केली असता झुडपात तान्हुली कापडात गुंडाळलेल्या स्थितीत आढळली. पोलिसांनी आपल्या जीपमधून तान्हुलीला उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. तान्हुलीची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीही मलकापूर-शास्त्रीनगर येथे महामार्गाच्या पादचारी पुलावर पंधरा दिवसांची तान्हुली बेवारस स्थितीत आढळली होती. तिच्या नातेवाइकांचा शोध अद्याप पोलिसांना लागलेला नाही.
बेवारस सोडणाऱ्यांचा शोध सुरू
तान्हुलीला निर्जनस्थळी आणि रात्रीच्या वेळेस बेवारस स्थितीत सोडणाऱ्यांचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. त्यासाठी शनिवारी सकाळपासून वारुंजी फाटा परिसरातील रहिवाशांकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. त्यातून अद्याप तरी ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. (प्रतिनिधी)