श्वापदाच्या हल्ल्यात दहा कोकरे ठार; पाच जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:40 AM2021-01-13T05:40:38+5:302021-01-13T05:40:38+5:30
दरम्यान, मेंढपाळांच्या पालावर थांबलेल्या महिलांसमोर हा हल्ला झाला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विचारपूस करून विविध प्राण्यांचे फोटो त्या महिलांना दाखविल्यानंतर ...
दरम्यान, मेंढपाळांच्या पालावर थांबलेल्या महिलांसमोर हा हल्ला झाला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विचारपूस करून विविध प्राण्यांचे फोटो त्या महिलांना दाखविल्यानंतर दोन तरसांनी हा हल्ला केला असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. बिबट्याबरोबरच आता इतर जंगली श्वापदांची दहशत या भागात पसरत आहे.
रेठर खुर्द येथील डाग नावाच्या शिवारात अशोक भानुदास साळुंखे यांचे शेत आहे. साळुंखे यांच्या शेतात निंबोडे (ता. आटपाडी) येथील मोहन बिरा मुडे यांच्यासह दोन भावांच्या सुमारे तीनशे मेंढ्या बसवल्या आहेत. गत पाच दिवसांपासून याठिकाणी मेंढपाळाचे पाल लावलेले आहे. मेंढपाळ दररोज सकाळी मेंढ्या चारायला घेऊन जातात, तर महिलांसह मुले व लहान कोकरे पालावर असतात. कोकरांना डालगी व जाळीत ठेवले जाते. शनिवारी दुपारी १२ वाजता नेहमीप्रमाणे मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी शिवारात गेले होते. पालापासून जवळच मुडे यांची कोकरे ठेवली होती. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जाळीत ठेवलेल्या कोकरांचा ओरडण्याच आवाज आल्याने महिला धावत गेल्या असता जाळीतील कोकरांवर उभे कान व फिका पांढरट रंग, काळे पट्टे असलेल्या दोन प्राण्यांनी हल्ला चढवला असल्याचे निदर्शनास आले. आरडाओरडा करून त्या प्राण्यांना त्यांनी हुसकावून लावले. मात्र, तोपर्यंत सात कोकरे ठार, तीन गायब, तर पाच जखमी झाली होती. याबाबतची खबर शेतकरी साळुंखे यांच्यासह मेंढपाळांनी वनविभागाला दिली. वनपाल ए. पी. सवांखडे, वनरक्षक रमेश जाधवर, उत्तम पांढरे यांनी जागेवर जाऊन पंचनामा केला.
- चौकट
तीस हजारांचे नुकसान
रेठरे खुर्द येथे मुडे यांच्या पालावर श्वापदाने हल्ला करून १० कोकरे ठार, तर ५ जखमी केली. या पाळीव जनावरांची पंचांच्या मते बाजारभावाप्रमाणे सुमारे तीस ते बत्तीस हजारावर किंमत होते. मुडे यांनी सांभाळ केलेल्या मेंढ्यांच्या कोकरे हल्ल्यात ठार झाल्यामुळे त्यांचे सुमारे तीस हजाराचे नुकसान झाले आहे. या मेंढपाळांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.
फोटो : ०९केआरडी१०
कॅप्शन : रेठरे खुर्द (ता. कऱ्हाड) येथे याच जाळीत ठेवलेल्या कोकरांवर जंगली श्वापदाने हल्ला करून दहा कोकरे ठार, तर पाच गंभीर जखमी केली.