जागेअभावी दहा कोटींचा निधी पडून
By admin | Published: December 14, 2015 09:21 PM2015-12-14T21:21:53+5:302015-12-15T00:51:56+5:30
मलकापुरातील स्थिती : निधी परत जाण्याची भीती; अनेक कामे ठप्प; सत्ताधारी हतबल
मलकापूर : येथील नगरपंचायतीच्या जागाच ताब्यात नसल्याने कोट्यावधींचा निधी पडून आहे. अनेक वर्षांपासून मंजूर असलेली कामे करण्यात अडचणी येत असल्यामुळे मिळालेला निधी परत जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘देव आला द्यायला अन् पदर नाही घ्यायला’ अशी अवस्था निर्माण झाली आहे.
मलकापूर नगरपंचायतीच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून सुमारे शंभर कोटींचा निधी मलकापूरच्या पदरात पाडून घेतला. त्यापैकी काही कामे मार्गीही लागली. चांगले नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल्यामुळे नगरपंचायतीचे नाव राज्यात, देशात व काही अंशी देशाबाहेरही नावारूपास आले. मलकापूर आदर्श गाव म्हणून सर्वत्र रोलमॉडेल बनले. मंजूर निधींपैकी अनेक कामे आजही पूर्ण करता आलेली नाहीत. विकासकामांसाठी जागाच उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे.
नगरपंचायतीच्या मध्यवर्ती इमारतीसाठी तत्कालीन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहकार्याने सुमारे साडेसात कोटींचा निधी मंजूर झाला. त्यापैकी चार कोटी निधी नगरपंचायतीकडे वर्ग होऊन चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र, ज्या जागेवर ही इमारत उभी करण्याचे नियोजन व आराखडा नगरपंचायत प्रशासनाने केले आहे त्या जागेचा वादचं मिटता मिटेना. जिल्हाधिकाऱ्यांकडून त्या जागेचे हस्तांतरण नगरपंचायतीकडे होईल व लवकरचं काम सुरू होईल, अशी आशा सत्ताधारी व्यक्त करतात. तर विविध पातळीवर लढाई लढून ती जागा आपल्याकडेच कशी राहिल या प्रयत्नात विरोधक आहेत. या दोघांच्या भांडणात गावासाठी मिळालेला कोट्यावधी निधी अनेक वर्षे पडून आहे. कामाची वेळ संपत आल्यामुळे निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. नगरपंचायत इमारतीप्रमाणेच अग्निशामक केंद्र इमारत व इतर कामासाठी १ कोटीचा निधी मिळून पाच वर्षे उलटून गेली. केवळ जागेअभावी तेही काम आजतागायत अपुरेच आहे. या महत्वाच्या दोन इमारतींबरोबरच केवळ नगरपंचायतीच्या ताब्यात जागाच नसल्यामुळे अनेक कामे ठप्प आहेत. (प्रतिनिधी)...
मॉडेल तयार पण...
नगरपंचायत प्रशासकीय इमारतीचे मॉडेल तयार करण्यासाठी ई निविदा काढून लाखो रुपये खर्च करून दिल्ली येथील विज्ञान भवनची प्रतिकृतीच निर्माण करण्याचे मॉडेल तयार केले आहे. हे मॉडेल प्रत्यक्षात केव्हा अवतरणार याबाबत शहरातील नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
ज्या जागेवर नगरपंचायतीची इमारत बांधायची आहे. त्या जागेचे सर्व अडथळे दूर झाले आहेत. जागा हस्तांतरणाचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशही आम्हाला मिळाला आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल. कामाच्या वाढीव मुदतीसाठी नगरविकास विभागाकडे प्रस्तावही पाठवला आहे.
- मनोहर श्ािंदे, उपनगराध्यक्ष, मलकापूर नगरपंचायत