जिल्ह्यात दहाजण तडिपार
By admin | Published: September 25, 2015 11:56 PM2015-09-25T23:56:32+5:302015-09-26T00:13:46+5:30
गणेशोत्सव पार्श्वभूमी : चार मटका बहाद्दरांचाही समावेश
सातारा/वाई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने ‘हिटलिस्ट’वर असणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली असून, साताऱ्यामध्ये चार मटका बहाद्दर तर वाई आणि खंडाळा तालुक्यातील सहाजणांना तडिपार करण्यात आले आहे. आणखी २८ जण हिटलिस्टवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.समीर सलीम कच्छी (वय ३५ रा, सैदापूर) (टोळी प्रमुख), पोपट आनंदा माने (५८, रा. कोडोली, सातारा, मुळ रा. आरफळ ता. सातारा), यासीन इक्बाल शेख (३३, रा. शनिवार पेठ, सातारा), सचिन सुरेश मोरे (३२, रा. शनिवार पेठ, सातारा) या दोन्ही सातारा शहर व शाहूपुरी, सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटख्याचे जाळे निर्माण करत होत्या. त्यामुळे या चौघांना सातारा तालुका हद्दीतून सहा महिन्यांसाठी तडिपार करण्यात आले आहे. या चौघांवर वारंवार कारवाई करूनही त्यांच्यात सुधारणा होत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला.
वाई येथील कारवाईची माहिती देताना प्रांताधिकारी रवींद्र खेबूडकर म्हणाले, ‘४२ जणांचा हद्दपारीचा प्रस्ताव प्राप्त झाला असून त्यापैकी अमीर अकबर खान (रा. वाई) याची चार जिल्ह्यातून, संजय धायगुडे (रा. अहिरे, ता. खंडाळा) याची चार जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी, दादासाहेब वाखंडे व अमर वाखंडे (रा. वाकणवाडी, ता. वाई) यांची एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून, बंट्या उर्फ अनिकेत नारायण जाधव आणि वरुण समर जाधव (दोघेही रा. भुर्इंज) यांना तीन दिवसांसाठी सातारा, सांगली जिल्ह्यांतून तडिपार करण्यात आले आहे. या सर्वांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार तडिपार करण्यात आले आहे. हे सर्वजण ज्या जिल्ह्यात जातील तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात दर सोमवारी हजेरी लावणे त्यांना बंधनकारक असून आणखी काहीजणांना तडिपार केले जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)