चितळीत एकाच दिवशी दहा जण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:35 AM2021-04-03T04:35:25+5:302021-04-03T04:35:25+5:30
मायणी : चितळी (ता. खटाव) येथील कुंभारवाडा परिसरात एकाच दिवशी तब्बल दहा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण ...
मायणी : चितळी (ता. खटाव) येथील कुंभारवाडा परिसरात एकाच दिवशी तब्बल दहा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या ३० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील तुरुकमाने यांनी दिली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या परिसरामध्ये एक वयोवृद्ध महिला काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह होती. त्याच दरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. या परिसरातील अनेक लोक या वृद्ध महिलेच्या संपर्कात आल्याने या ठिकाणी हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला आहे. ग्रामस्थांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या असून, प्रशासनामार्फत योग्य त्या उपाययोजना सुरू असल्याची माहिती मायणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील तुरुकमाने यांनी दिली.
दरम्यान, ग्रामविकास अधिकारी फडतरे, सरपंच सतीश भिसे, उपसरपंच किशोर देशमुख, ग्रामपंचायत सदस्य संभाजी मंडले, देवानंद पवार, अभिजित पवार, भीमराव होनमाने या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी केली आहे.
कोट...
नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय न फिरण्यास सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामपंचायतीकडून योग्य त्या उपाययोजनांची आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार अंमलबजावणी सुरू आहे.
- सतीश भिसे, सरपंच
०२मायणी कोरोना
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या परिसरामध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी निर्जंतुकीकरण फवारणी केली. (छाया : संदीप कुंभार)