दहा हजार बाळांनी घेतला पहिला श्वास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:26 AM2021-06-29T04:26:05+5:302021-06-29T04:26:05+5:30
कऱ्हाड : कोरोनाकाळात अनेकांवर ओढवलेला अकाली मृत्यू जिवाला चटका लावून गेला; पण याच कालावधीत तब्बल दहा हजार बाळांनी त्यांच्या ...
कऱ्हाड : कोरोनाकाळात अनेकांवर ओढवलेला अकाली मृत्यू जिवाला चटका लावून गेला; पण याच कालावधीत तब्बल दहा हजार बाळांनी त्यांच्या आयुष्यातील पहिला श्वास घेतला. एकीकडे कोरोनाने जगण्यात नकारात्मकता निर्माण केलेली. मात्र, दुसरीकडे या चिमुकल्यांच्या सोनपावलांनी हजारो कुटुंबांना आयुष्य जगण्यासाठी नवी उमेद मिळवून दिली आहे.
गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना महामारीचे संकट आहे. या कालावधीत अनेकांचा अकाली मृत्यू झाला. क्षणात होत्याचे नव्हते झाले. अनेकांचा धीर खचला. उमेद कोसळली. काही कुटुंबे तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. महामारीचे संकट, लॉकडाऊनची भर, ढासळलेली आर्थिक परिस्थिती या सर्वाचा परिणाम प्रत्येकाच्या आयुष्यावर झाला. नकारात्मकता वाढल्यामुळे प्रत्येक जण हताश झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, याच कोरोना कालावधीत अनेकांच्या आयुष्याला आशेचा नवा किरण मिळाला आहे. तब्बल दहा हजार बाळांनी याच कालावधीत जन्म घेतला असून, त्यांच्या येण्याने हजारो कुटुंबे सुखावली आहेत.
कऱ्हाड शहरात उपजिल्हा रुग्णालयासह पंचवीसहून जास्त तर मलकापुरात कृष्णा रुग्णालयासह सुमारे अकरा मोठी रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये जन्म झालेल्या बाळांची नोंद त्या-त्या नगरपालिकेत केली जाते. येथे जन्म घेणारी बहुतांश बालके कऱ्हाडसह परिसरातील तालुक्यांमधील असतात. तर काही वेळा पुण्यासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील बालकांचा जन्मही येथील रुग्णालयांमध्ये होतो.
- चौकट
निराशेचे मळभ झाले दूर
कोरोना महामारीने अनेक कुटुंबांच्या आयुष्यात निराशेचे सावट निर्माण केले. ही निराशा त्या एकट्या कुटूंबापुरती नाही तर कोरोनाने जाणारा प्रत्येक बळी हा समाजमन सुन्न करणारा आहे. या काळात आशेचा किरण दिसेल अशा अपवादात्मक घटना घडल्या. त्यामध्येच बाळांचा जन्म ही महत्त्वाची सुखद बाब आहे.
- चौकट
मृत्यूदरापेक्षा जन्मदर जास्त
कोरोनामुळे गत वर्षभरापासून मृत्युदर वाढला आहे. मात्र, या मृत्युदरापेक्षा जन्मदर कित्येक पटींनी जास्त आहे. नव्याने आयुष्यात आलेल्या या चिमुकल्यांमुळे संबंधित कुटुंबांना आशेचा किरण मिळाला आहे.
- चौकट
जन्म-कोरोना मृत्यू सरासरी
बाळांचा जन्म : ७२ टक्के
कोरोना मृत्यू : २८ टक्के
- चौकट
मार्च २०२० ते मार्च २०२१ मध्ये बाळांचा जन्म
महिना : मलकापूर : कऱ्हाड
मार्च : ४१९ :
एप्रिल : ३४६ :
मे : ३०४ :
जुन : २३१ :
जुलै : २७३ :
आॅगस्ट : ३१५ :
सप्टेंबर : ३०६ :
आॅक्टोबर : ३९५ :
नोव्हेंबर : ३३३ :
डिसेंबर : ४२६ :
जानेवारी : ३९८ :
फेब्रुवारी : २९३
मार्च : ३५० :
- चौकट
वर्षभरात बाळांचा जन्म
कºहाड : ५०००
मलकापूर : ४७२४
- चौकट
कोरोनाग्रस्त मातांनाही दिलासा
मलकापूर शहराच्या हद्दीतील रुग्णालयांमधे २९९ कोरोनाग्रस्त गर्भवती मातांची प्रसूती झाली. डॉक्टर, परिचारिकांनी या मातांना मानसिक आधार देत त्यांच्या चिमुकल्यांची काळजी घेतली. त्यामुळे मातांनी कोरोनावर मात करीत आपल्या चिमुकल्यांनाही जगण्याचे बळ दिले.
फोटो : २८केआरडी०५. ०६
कॅप्शन : प्रतीकात्मक