महास्वच्छता अभियानात दहा हजार ग्रामस्थांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:23 PM2018-12-14T22:23:40+5:302018-12-14T22:24:19+5:30
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे शनिवारी महास्वच्छता अभियानाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने सर्व शाळा आणि दहिवडीकर मिळून तब्बल दहा हजार ग्रामस्थांचा
दहिवडी : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे शनिवारी महास्वच्छता अभियानाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने सर्व शाळा आणि दहिवडीकर मिळून तब्बल दहा हजार ग्रामस्थांचा पहिल्याच दिवशी सुंदर दहिवडी करण्यासाठी भाग घेणार आहेत.
दहिवडीतील जवळपास ५०ते ६० ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी जागा निवडल्या आहेत. यात २०० लोकांचा व शालेय मुलांचा एकगट, त्यासाठी शाळेचे ६ शिक्षक एक नरसेवक २ कर्मचारी असा ग्रुप तयार केला आहे.
यासाठी लागणारी यंत्रसामग्री नव्याने खरेदी केली आहे. ज्यांना शक्य आहे, अशा लोकांनी, शालेय मुलांनी झाडू, फावडे, खुरपे, खराटे, घमेली उपलब्ध असल्यास घेऊन येण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियाची भूमिका लक्षात घेऊन व्हॉट्सअॅपवर वेगवेगळे ग्रुप तयार केले आहे. तसेच स्वच्छ दहिवडी, सुंदर दहिवडीसाठी प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिल्या जात आहेत.
पालिकेचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक स्वत: अभियानात सहभागी होण्यासाठी पत्रव्यवहार करीत आहेत. याला दहिवडीकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी स्वच्छता सुरू करून वातावरण निर्मिती केली आहे.
महाश्रमदानामध्ये तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, खासगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा, कॉलेज, महाविद्यालय, पतसंस्था, कर्मचारी, डॉक्टर, मेडिकल, वकील, रिक्षा, जीप, संघटना, व्यापारी, व्यावसायिक, अंगणवाडी, सेविका, बचतगट, महिला, आर्ट आॅफ लिव्हिंग, पाणी फाउंडेशन टीम, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, गणेश मंडळे यांना आमंत्रित केले आहे. दहिवडीत अनेक ठिकाणी स्वच्छतेची सुरुवात करण्यात आली आहे.
स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी घंटागाडीचा वापर
दहिवडी परिसरात अभियानाचा मोठा फिवर वाढत चालला असून, नगरपालिकेचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, पदाधिकारी यांनी मोठी मेहनत घेतली आहे. अनेक ठिकाणी रंगरंगोटी, भिंतीवर डिजिटल बॅनरवर स्वच्छतेचे संदेश लावले आहेत. याशिवाय वासुदेवाच्या व पथनाट्याच्या माध्यमातून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. घंटागाडी, रिक्षा यांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
दहिवडी येथील विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी स्वच्छता मोहिम राबविली.