दहा वर्षांपासून सलीमभार्इंच्या अंगणात तहानलेल्या गायी तृप्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 11:57 PM2018-04-25T23:57:06+5:302018-04-25T23:57:06+5:30
जावेद खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : उन्हाचा पारा वाढला की मोकाट फिरणाऱ्या जनावरांची पावले कमानी हौद परिसरातील बेकरीकडे वळतात. आडोशाला येऊन उभ्या राहिलेल्या या जनावरांना एक दशकापूर्वी त्यांनी पहिल्यांदा
पाणी पाजले. त्यानंतर मोकाट जनावरांचे व त्यांचे ‘पाणीदार’ नाते घट्ट झाले. गेल्या दहा वर्षांत अनेक वेळेला मुक्या प्राण्यांना पाणी देण्याचा कित्ता त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे कुटुंबीयही गिरवितात, हे विशेष!
येथील कमानी हौद परिसरात रिक्षा स्टॉपशेजारी सलीम शेख यांची बेकरी आहे. या बेकरीच्या बाहेर पूर्वी नळ होता. नळाला पाणी आल्याची माहिती मिळावी म्हणून या नळाखाली स्टीलची बादली ठेवली जात
होती.
सुमारे दहा वर्षांपूर्वी भल्या सकाळी एक गाय आणि खोंड त्या रिकाम्या बादलीत तोंड घालू लागले. हे पाहून शेख यांनी बादलीत पाणी ओतले. गाय आणि खोंड यांनी पाणी पिले आणि तेथून निघून गेले. त्यानंतर गेल्या दहा वर्षांत शेकडो
मोकाट कुत्री, गाय, खोंड, बैल यांनी शेख यांच्याबरोबर नाते निर्माण केले.
गेल्या दहा वर्षांपासून पाणी प्यायच्या तीन वेळा !
रात्री आडोशाला बसलेली ही मोकाट जनावरे सकाळी उजाडले की सहा-साडेसहाच्या सुमारास मार्गस्थ होतात. सलीम शेख सकाळी सहा वाजता बेकरी उघडतात. त्यामुळे ही मोकाट जनावरे सकाळी सहा ते साडेसहादरम्यान येथे पाणी पिण्यास येतात. त्यानंतर सकाळी दहा आणि बारा यावेळेत मोकाट जनावरे येथे येतात. दिवसभरात साधारण दहा बादल्या पाणी त्यांना यासाठी लागते. पाणी प्यायला येणारी जनावरे शेख पाणी देत नाहीत तोवर बेकरीच्या भिंतीला टेकून उभे राहतात. बादलीत पाणी ओतले की पाणी पिऊन ते निघून जातात. उन्हाची तीव्रता अधिक असेल तर संध्याकाळी चारच्या सुमारासही या जनावरांचा एक फेरफटका त्यांच्याकडे होतो. ही जनावरे वर्षभर त्यांच्याकडे येऊन पाणी पितात. हे प्रमाण उन्हाळ्याच्या दिवसांत वाढते.