भाडेकरू अन् घरमालकांत उडताहेत खटके !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:47 AM2021-06-09T04:47:55+5:302021-06-09T04:47:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : कोरोनाच्या काळात दीड वर्षामध्ये सर्वच क्षेत्रांत घडी विस्कटली आहे. रोजंदारी गेल्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची दुकानदारी ...

Tenants and landlords are flying! | भाडेकरू अन् घरमालकांत उडताहेत खटके !

भाडेकरू अन् घरमालकांत उडताहेत खटके !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : कोरोनाच्या काळात दीड वर्षामध्ये सर्वच क्षेत्रांत घडी विस्कटली आहे. रोजंदारी गेल्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची दुकानदारी बंद झाल्याने खाण्याचे वांधे झाले आहेत. कुलूप लावून गावी गेलेल्या भाडेकरूंच्या कुलपावर मालकाने दुसरे कुलूप लावले आहे. कित्येक महिन्यांपासून घरभाडेही थकल्याने घरमालक आणि भाडेकरू यांच्यात हमरीतुमरी होऊन टोकाचे वाद निर्माण होऊ लागले आहेत. प्रसंगी दोघांनाही पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागत आहे.

खटाव तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या वडूज शहरात शाळा, दवाखाने, शासकीय कार्यालये असल्याने या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्यांची संख्या जादा आहे. मात्र दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या काळात अनेकजणांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसायही ठप्प, रोजगार बंद असल्याने सर्वसामान्यांची अवस्था बिकट झाली आहे. या काळात जीव मेटाकुटीला आला असून, यावर पर्यायी तोडगा काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत.

घरे बंद असूनही थकीत लाईट बिल व परगावी गेलेले भाडेकरू या द्विधा मनस्थितीतील घरमालकांनी घराला भाडेकरूंच्या कुलपावर कुलूप लावल्याने वाद निर्माण होऊ लागले आहेत. रोजगार बंद व व्यवसाय नसल्यामुळे थकलेले भाडे आणि भाड्यासाठी घरमालकांचा सुरू असलेला तगादा याने भाडेकरू वैतागले आहेत. त्यामुळे ‘दुष्काळात तेरावा महिना’ याप्रमाणे अवस्था झालेली आहे.

कोरोनाने विचलित झालेल्या जनतेने आपले राहणीमान बदलले असून लोक गरज असलेल्या वस्तूंची खरेदी करताना आढळत आहेत. अनावश्यक खर्चाला बगल फाटा देत काळाची गरज ओळखून दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचीच खरेदी करीत आहेत. किराणा माल व भाजी मंडई या व्यतिरिक्त खरेदीसाठी कोणताही नागरिक रस्त्यांवर फिरताना आढळून येत नाहीत. गरजा कमी करून पैशांची बचत हाच मूलतंत्र सध्या सुरू असल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे. हौस, मौजमजा करण्याचे दिवस नसल्याचे अनेकांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे. घरमालकांसह भाडेकरू अडचणींना सामोरे जात आहेत. ग्रामपंचायत व नगरपंचायत प्रशासनाने वार्षिक घरपट्टी पूर्णतः माफ करावी; तरच ते घरमालक भाडेकरूंना काही प्रमाणात सूट देऊ शकतील; कारण या संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी किती काळ लागेल, हे कोणीच सांगू शकत नाही.

मालकांनी बँकांचे कर्ज घेऊन घरे बांधली आहेत. स्वत:ला राहण्याबरोबरीने इतर खोल्या भाड्याने देऊन ते उदरनिर्वाह चालवीत आहेत. भाड्यापोटी लावलेला तगाद्यामुळे अनेकांचे वादविवाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. घरमालकांचे म्हणणे रास्त असले तरी सध्याचा काळ पाहता भाडेकरू भाडे कोठून देणार हा प्रश्न आहे. दोघेही त्यांच्या भूमिकेत योग्य आहेत.

प्रतिक्रिया

नगरपंचायत कर आकारणी माफीबाबत शासनस्तरावरून निर्णय झालेला नाही. तसा अध्यादेश शासनाकडून जारी झाल्यास अंमलबजावणी होईल. सध्याचा काळ हा सर्वांसाठीच कठीण असून समन्वयातून मार्ग काढायला हवा.

- माधव खांडेकर,

मुख्याधिकारी, वडूज नगरपंचायत

व्यवसायातील चढ-उतार आणि रोजगार बंद असल्याने या महामारीत कुटुंबे उद‌्ध्वस्त होत आहेत. तरी शासनाने इतर कर आकारणीबरोबरीने घरफाळा व‌ वीज बिले माफीबाबत तातडीने निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा.

- दिनेश शेटे,

भाडेकरू

संग्रहित फोटो वापरणे

Web Title: Tenants and landlords are flying!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.