Satara: कऱ्हाडात दोन गटांत राडा, तलवारी नाचवत जमावाकडून दगडफेक; आठ जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 01:34 PM2023-07-11T13:34:02+5:302023-07-11T13:41:16+5:30
पोलिसांना न जुमानता युवक एकमेकांना भिडले
कऱ्हाड : शहरातील आंबेडकर पुतळा ते जोतिबा मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर पालकरवाडा येथे रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास युवकांच्या दोन गटांत जोरदार राडा झाला. युवकांनी तलवारी नाचवत दगडफेक केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना न जुमानता युवक एकमेकांना भिडले. या प्रकरणी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात अकरा जणांवर गुन्हा दाखल करून, आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ओमकार उर्फ अहमद सलीम शेख, करण शशिकांत काटरे, प्रज्वल तुळशीनंद कांबळे, अमोल बबन काटरे, हर्ष राकेश कांबळे, आशपाक सलीम शेख, जीवन दुर्योधन कांबळे, आकाश गंगाधर कांबळे (सर्व जण रा.बुधवार पेठ, कऱ्हाड), अमन साजिद शेख, इरफान अश्रफ कच्छी आणि साहिल आलम मुजावर (सर्व रा.मंगळवार पेठ, कऱ्हाड) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जोतिबा मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर पालकरवाडा येथे रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास काही युवकांमध्ये मारामारी सुरू होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पेट्रोलिंग करणारे पोलिस पथक त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी दहा ते पंधरा युवक हातात तलवार घेऊन एकमेकांच्या दिशेने दगडफेक करीत, शिवीगाळ, दमदाटी करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी युवकांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, तरीही युवक एकमेकांना मारहाण करीत होते. त्यामुळे अधिक पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. काही वेळातच पोलिस फौजफाटा त्या ठिकाणी पोहोचला. आठ युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर इतर युवक पोलिसांना पाहताच तेथून पळून गेले. या प्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मारुती सराटे तपास करीत आहेत.
दुकाने बंद; परिसरात दहशत
पालकरवाडा येथे मारामारी व दगडफेक सुरू असताना, मोठी दहशत निर्माण झाली होती. शहरभर अफवा पसरल्यामुळे अनेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली, तसेच दगडफेकीमुळे नागरिकही दरवाजा बंद करून घरामध्ये बसले होते. पोलिस घटनास्थळी पोहोचताच, मारामारी करणारे युवक तेथून पसार झाले. घटनास्थळी सोमवारी दिवसभर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.