थकबाकीदार झाले ‘टेन्शन फ्री’
By admin | Published: March 15, 2015 10:22 PM2015-03-15T22:22:18+5:302015-03-16T00:15:42+5:30
लोकअदालतमध्ये तडजोड : तीस लाखांची घरपट्टी वसुली करून जावळी अव्वल
कुडाळ : ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकीची वसुलीसाठी ग्रामविकास विभाग व न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमान महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जावळीतील एकूण ३४५४ प्रकरणे मिटवून त्यामधून ३० लाख ३७ हजार ७११ रुपयांचा महसूल गोळा करीत जिल्ह्यात जावली तालुका अव्वल ठरला आहे.मेढा पंचायत समितीत थकबाकीदारांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. या लोकअदालतमध्ये आपल्या हरकतीदेखील थकबाकीदारांनी मांडल्या. काही थकबाकीदारांनी एवढी घरपट्टी कशी आली, अशाही आपल्या तक्रारी मांडल्या. अशा थकबाकीदारांच्या प्रश्नांचे अधिकाऱ्यांनी निवारण केले. जावळीतून ७५ ग्रामपंचायतींतील ६४५० खातेदारांकडून ३० लाख ३७ हजार ७११ रुपये एवढी घरपट्टी, पाणीपट्टी वसूल करण्यात आली.जिल्ह्यात आयोजित केलेल्या या लोकअदालतीत जावळी तालुक्याने सर्वाधिक महसूल गोळा करीत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. त्यासाठी सभापती गिरी, उपसभापती निर्मला कासुर्डे, सदस्य मोहनराव शिंदे, हणमंतराव पार्टे, सारिका सपकाळ, रूपाली वारागडे यांच्यासह पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांनी सहकार्य केले.
या वसुलीमुळे ग्रामपंचायतीच्या महसुलात चांगलीच वाढ झाली आहे. तर अजूनही काही थकबाकीदार राहिलेले आहेत. त्यांच्यासाठी ११ एप्रिलला लोकअदालतीचे आयोजन केले असल्याचे गटविकास अधिकारी गजानन भोसले यांनी सांगितले. तर यावेळी थकबाकीदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
दहा वर्षात चांगला प्रतिसाद
जावळी तालुक्यामध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटीसा बजावून ग्रामपंचायतीचे कर्मचारी थकून गेले होते. अनेकदा थकबाकीदरांच्या घरावर जप्तीचीही कारवाई करण्यात आली. मात्र स्थानिक पातळीवर वाढत असलेल्या दबावामुळे कारवाईमध्ये हस्तक्षेपासारखे प्रकार घडत होते. मात्र या लोकअदालतीमुळे नागरिकांनी जुने हेवे दावे सोडून आपली थकबाकी जमा केली. गेल्या दहा वर्षात ग्रामपंचायतींना असा कधीच नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही.