महाबळेश्वर बसस्थानकात बॉम्बच्या अफवेने तणाव, बॉम्ब असल्याचा होता निनावी फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 08:17 PM2022-09-07T20:17:32+5:302022-09-07T20:18:53+5:30
पथकांची शोधाशोध. महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
महाबळेश्वर : महाबळेश्वर बसस्थानकातील एका चारचाकी वाहनात बॉम्ब असल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून दिल्याने महाबळेश्वरात एकच खळबळ उडाली. मंगळवारी सायंकाळी व बुधवारी दुपारपर्यंत विविध पथकांकडून बॉम्बचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु कुठेही बॉम्ब अथवा बॉम्बसदृश वस्तू आढळून न आल्याने महाबळेश्वरवासीयांचा जीव भांड्यात पडला. निनावी फोन करून बॉम्बची माहिती देणाऱ्या विरोधात महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वरमधील बसस्थानकात बॉम्ब ठेवला असल्याचा फोन अज्ञाताने मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गाडी क्रमांकासह पोलिसांना केला होता. यानंतर तातडीने महाबळेश्वर पोलिसांनी बसस्थानक, आगार परिसरात तपासणी केली; मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.
मंगळवारी रात्रीपासून बसस्थानकात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता; परंतु माहितीची खातरजमा करण्यासाठी बुधवारी पुन्हा सातारा येथून दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक-नाशक पथक व श्वानपथक अशा विविध पथकांचे अधिकारी बसस्थानक परिसरात दाखल झाले होते. या पथकांनी स्थानकातील प्रत्येक चारचाकी वाहनांसह प्रवाशांच्या सामानाची देखील तपासणी सुरू केली. पथक एवढ्यावरच न थांबता बसस्थानकातील बेवारस वाहनांची देखील तपासणी करण्यात आली. बस आगार, बसस्थानकासमोरील टॅक्सीतळ व परिसरातही तपासणी केली. पथकाने बाजारपेठेत देखील फेरफटका मारून बॉम्ब ठेवलेले वाहन शोधण्याचा प्रयत्न केला. तीन तासांच्या या तपासणीमध्ये बॉम्बसदृश कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या अज्ञाताचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांच्या शोधमोहीमेमुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.
बॉम्बशोध पथक उशिरा दाखल
बसस्थानक परिसरातील वाहनात बॉम्ब असल्याचा निनावी फोन मंगळवारी सायंकाळी पाच वाजता आला व त्यानंतर तब्बल अठरा ते वीस तासानंतर हे पथक शोधमोहिमेसाठी दाखल झाले. त्यामुळे हे शोधपथक नक्की सातारा येथून आले होते की दिल्ली वरून आले याबाबत प्रवाशांमध्ये चर्चा सुरू होती. दरम्यान, अशा संवेदनशील प्रकरणाबाबत पोलिसांनी दाखवलेली असंवेदना महाबळेश्वर शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.