पवनचक्कीतून ठिणगी उडाल्याने मांडवास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:35 AM2021-04-03T04:35:07+5:302021-04-03T04:35:07+5:30
सणबूर : वाल्मिक पठारावरील निगडे येथे पवनचक्कीची वायर ट्रिप होऊन उडालेल्या ठिणग्या जनावरांच्या मांडवावर पडल्याने लागलेल्या आगीत शुक्रवारी ...
सणबूर : वाल्मिक पठारावरील निगडे येथे पवनचक्कीची वायर ट्रिप होऊन उडालेल्या ठिणग्या जनावरांच्या मांडवावर पडल्याने लागलेल्या आगीत शुक्रवारी बैल, म्हैस व रेडा भाजून गंभीर जखमी झाला. याबाबतची पाटणचे तहसीलदार, मंडलाधिकारी व तलाठी यांना माहिती देण्यात आली आहे.
याबाबत निगडेचे माजी सरपंच हणमंत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडे येथे महादेव बाळकू टेटमे यांनी आपल्या जागेत जनावरांसाठी मांडव घातला होता. सावलीसाठी वर कडबा भुईमुगाच्या जाळ्या आणि गवत टाकले होते. निगडे येथे सुझलॉन पवनऊर्जा कंपनीचे पाॅवर स्टेशन (सबस्टेशन) आहे. त्या मांडवाजवळून सुझलाॅन कंपनीच्या वीजवाहक तारा गेलेल्या आहेत. शुक्रवारी दिवसभर वारा मोठ्याने वाहत आहे. बहुधा त्यामुळे वायर ट्रिप झाली. त्यामुळे ठिणग्या उडून मांडवावर पडल्या. सावलीसाठी मांडवावर टाकलेले गवत व कडब्याने लगेच पेट घेतला. मांडवात बैल, रेडा, म्हैस बांधली होती. मांडवाने पेट घेतल्याने लागलेल्या आगीत तिन्ही जनावरे होरपळून गंभीर जखमी झाली आहेत. आग लागल्याचे लक्षात आल्यावर ग्रामस्थ धावून आले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोवर तिन्ही जनावरे गंभीर भाजून जखमी झाली. गावकामगार तलाठ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. ग्रामसेवक संभाजी थोरात यांनी घटनेचा पंचनामा केला आहे व त्याबाबतचे पत्र तहसीलदार पाटण यांना दिले आहे. संबंधित सुझलॉन कंपनीने याची जबाबदारी घेऊन त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संबंधित शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
फोटो
०२सणबूर-फायर
वाल्मिकी पठारावरील सणबूर येथे पवनचक्कीच्या वायरमधून ठिणगी पडल्याने मांडवाला आग आली. यामध्ये म्हैस भाजून जखमी झाली. (छाया : बाळासाहेब रोडे)