खंडाळा इथं कारचा भीषण अपघात; महिलेसह १० वर्षाचा मुलगा जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2023 10:24 AM2023-03-02T10:24:13+5:302023-03-02T11:22:52+5:30
भरधाव वेगाने आली असता कारने महामार्गालगत अवैधरित्या थांबलेल्या मालट्रकला जोरदार धडक दिली
मुराद पटेल
शिरवळ - पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा गावच्या हद्दीमध्ये बाळूमामाच्या मेंंढरांचे दर्शन घेऊन परतणा-या भाविकांच्या कारने महामार्गालगत अवैधरित्या थांबलेल्या मालट्रकला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत महिलेसह दहा वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहे.यावेळी अपघातस्थळी मोठी विचिञ परिस्थिती निर्माण झाली होती.दरम्यान,एक मार्च रोजी राञी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की,पुणे जिल्ह्यातील वडगाव रासाई ता.शिरुर येथील वनशिवे,कुलते कुंटूंबिय नातेवाईकांसमवेत सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या बाळूमामाच्या दर्शनासाठी कार (क्रं.एमएच-13-एन-3154) मधून गेले होते.यावेळी दर्शन घेऊन परत घरी पुणे बाजूकडे परतत असताना कार खंडाळा येथील एका हॉटेलसमोर भरधाव वेगाने आली असता कारने महामार्गालगत अवैधरित्या थांबलेल्या मालट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक ऐवढी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
कारमध्ये बसलेल्या कांचन चंद्रकांत वनशिवे(वय30,वडगाव रासाई ता.शिरुर जि.पुणे),विरेंद्र चंद्रकांत वनशिवे(वय 10) हे दोघे जागीच ठार झाले तर कारमधील संकेत भिमाजी चौधरी (वय 22,रा.वडगाव रासाई ता.शिरुर जि.पुणे),स्नेहल पांडुरंग कुलते(वय 42,रा.अकोला),अनिल मुक्ताराम कुलते(वय 55,रा.अकोला),अंजली अनिल कुलते(वय 50,रा.अकोला),परी अनिल कुलते(वय 7) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहे.दरम्यान,घटनेची माहिती मिळताच तत्काळ खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसहित घटनास्थळी धाव घेतली.यावेळी कारचा चक्काचूर झाल्याने जागीच ठार झालेल्या कांचन वनशिवे व विरेंद्र वनशिवे यांचे मृतदेह काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत क्रेनच्या साहाय्याने कारचा भाग बाजूला करत घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने मृतदेह काढण्यात खंडाळा पोलीसांना यश आले.
यावेळी गंभीर जखमी झालेल्या भाविकांना खंडाळा येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु आहे.या घटनेची नोंद करण्याचे काम खंडाळा पोलीस स्टेशनला सुरु होते.