रस्तादुरुस्तीची रेल्वे विभागाकडून ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:44 AM2021-08-13T04:44:31+5:302021-08-13T04:44:31+5:30
ओगलेवाडी : कऱ्हाड रेल्वे स्टेशन ते पुलापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची रेल्वे प्रशासनाकडे ...
ओगलेवाडी : कऱ्हाड रेल्वे स्टेशन ते पुलापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची रेल्वे प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे त्रस्त झाल्याने हजारमाची ग्रामपंचायतीने रविवार, दि. १५ रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला. त्याची दखल घेत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून पाहणी केली. तसेच रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे आश्वासन दिले. त्यामुळे नियोजित आंदोलनास स्थगिती दिली आहे.
यावेळी हजारमाचीच्या सरपंच विद्या घबाडे, उपसरपंच प्रशांत यादव, रेल्वेचे अधिकारी ओ. पी. एस. यादव, व्ही. के. सक्सेना, प्रबंधक सुग्रीव मीना, कल्याणराव डुबल, अवधूत डुबल उपस्थित होते.
अनेक वर्षे रेल्वे स्टेशन ते पुलापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ता रेल्वे स्टेशन हद्दीत असल्याने या ठिकाणी इतर कोणताही निधी टाकून दुरुस्ती करता येत नाही. रेल्वे मालधक्क्यावर येणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक याच रस्त्यावरून होत असते. या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला कोट्यवधी रुपये उत्पन्न मिळते. कऱ्हाड रेल्वेस्थानक हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वेस्थानक आहे. कऱ्हाड, कडेगावसह पाटण, खटाव, शिराळा तालुक्यांतील प्रवासी या स्थानकाचा वापर करतात. हा रस्ता ऐतिहासिक सदाशिवगड ग्रामपंचायतीच्या समोरून जात आहे. अनेक सुविधा निर्माण करण्यात अग्रेसर असणारी ही ग्रामपंचायत हा रस्ता रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात असल्याने इच्छा असूनही दुरुस्ती करू शकत नव्हती आणि रेल्वे प्रशासन या रस्त्याच्या बाबतीत गांधारीच्या भूमिकेत होते. रेल्वे प्रशासन या परिसरातील रस्ता करण्याबाबत दुर्लक्ष करीत होते. उपसरपंच प्रशांत यादव यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनी आंदोलनाचा इशारा दिला होता.