लॉकडाऊनमुळे पाठ्यपुस्तके अद्यापही विद्यार्थ्यांकडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:40 AM2021-05-12T04:40:48+5:302021-05-12T04:40:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मागील शैक्षणिक वर्षात सुस्थितीत असलेली पुस्तके विद्यार्थ्यांकडून परत घेण्यात येणार आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मागील शैक्षणिक वर्षात सुस्थितीत असलेली पुस्तके विद्यार्थ्यांकडून परत घेण्यात येणार आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्ये शाळाच बंद असल्यामुळे आणि परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत झाल्याने ही पाठ्यपुस्तके अद्याप विद्यार्थ्यांकडेच आहेत. दरम्यान, १५ जूननंतरही ही पुस्तके शाळा जमा करून घेऊ शकेल, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने तसेच खर्च वाचविण्याच्या विचाराने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या पुस्तकांची छपाई यंदा कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या शैक्षणिक वर्षात सुस्थितीत असलेली पुस्तके विद्यार्थ्यांकडून परत घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळांना संच पुन्हा घेण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, लॉकडाऊन आणि शाळा बंद असल्यामुळे पालकांना पुस्तकं देणं आणि शिक्षकांना घेणं शक्य होत नसल्याने हे संच अद्याप जमा करून घेतले गेले नाहीत.
शासकीय व अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येतात. त्यासाठी दरवर्षी मे महिन्यात पुस्तकांची मागणी पाठ्यपुस्तक मंडळाकडे नोंदणी केली जाते. गेल्या वर्षी शाळा सुरू झाल्या नाहीत, तरीही जून व जुलै महिन्यातच विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके पुरविण्यात आली होती. ती पुस्तके सुस्थितीत असतील, असे गृहित धरून यंदा सुस्थितील पुस्तके पुनर्वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी निकाल लागण्याच्या दिवशी किंवा शाळेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून पुस्तके परत घेतली जातात. यंदा मात्र शाळा बंद होत्या. परिणामी पुस्तके शाळांमध्ये परत आली नाहीत. शिक्षकांनी घरोघरी जाऊन पुस्तके वाटप केली तसेच पुस्तकेही परत घेण्यासाठी गेले तरीही कोरोनामुळे ते शक्य होईल, याबाबत शंका आहे.
कोविडमुळे मागणीत घट होण्याची शक्यता
पुस्तकांची शैक्षणिक वर्षातील मागणी ही त्यांच्या मागील वर्षीच्या एकूण विद्यार्थी संख्येनुसार होत असते. यंदा या मागणीत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यंदाचा पूर्ण अभ्यास ऑनलाईन पध्दतीने झाल्यामुळे पुस्तकांचा किती आणि कसा वापर केला गेला आणि ती सुस्थितीत असतील की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थी संख्येतही घट होण्याची शक्यता असल्याने मागणीत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पालक म्हणतात...
माझ्या मुलाला दिलेली पुस्तके दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या उपयोगाला यावीत, त्यांनीही शिक्षण घेऊन गुणवंत व्हावे, यासाठी शाळांनी पुस्तके मागितलेली आहेत. मात्र, कोविड परिस्थिती सगळ्यांनाच माहिती असल्याने पुस्तके परत करण्यासाठी शाळा सुरू होण्याची वाट पाहावी लागेल.
- नितीन शिर्के, पालक
पुस्तके पुनर्वापराच्या पर्यायामुळे पर्यावरणाची हानी रोखली जाणार आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे यंदा पुस्तकांचा वापर मर्यादितच झाला. त्यामुळे ही पुस्तके सुस्थितीत आहेत. त्यांचा उपयोग अन्य विद्यार्थ्यांना होणं खूप आवश्यक आहे. पण शाळा बंद असल्याने ती परत करता आली नाहीत.
- वैशाली फरांदे, पालक
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कोविड काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संच घरपोच केले आहेत. आता ते परत आणणं शक्य नाही. कोविडची परिस्थती लक्षात घेता १५ जूननंतर ही पुस्तके पुन्हा घेणं शक्य आहे. सध्या नवी पुस्तकं नसल्याने विद्यार्थी यावर सरावही करू शकतील.
- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, सातारा
जिल्हा परिषद शाळेत जमा होणारे पाठ्यपुस्तक संच
पहिली : २११९१
दुसरी : २३९६४
तिसरी : २४८५२
चौथी : २५२४७
पाचवी : १२०१३
सहावी : ९८९६
सातवी : ९३८९
आठवी : ७८९
मागील वर्षी संच वाटप : १ लाख २७ हजार ३४१