नात्यातील लग्नामुळे वाढतायत थॅलेसेमियाचे रुग्ण जिल्ह्यात ३०० जणांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:23 AM2020-01-22T00:23:14+5:302020-01-22T00:23:50+5:30
थॅलेसेमियावर कायमस्वरूपी उपचार नाही; पण तरीही अनेकजण अंधश्रद्धा म्हणून चटके देऊन हा आजार बरा होतो, असा समज करून आहेत. परिणामी बालकांचे शारीरिक हाल होतात, त्यातून बरं वाटण्याचा उपायच शिल्लक राहत नाही. या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील विविध संस्थांकडून प्रयत्न केले जात आहेत.
प्रगती जाधव-पाटील ।
सातारा : नात्यात केलेल्या लग्नामुळे थॅलेसेमिया रुग्णांचे प्रमाण वाढल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत तब्बल ३०० रुग्णांची नोंद झाली असून, ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. या रुग्णांना तातडीने संसर्ग होत असल्याने जिल्हा रुग्णालयात त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्डाची आवश्यकता असल्याचे समोर आले आहे.
लग्न करताना एकच नाड असू नये, असा पूर्वीच्या लोकांचे म्हणणे होते. एकच नाड किंवा एकाच जनुकात जन्मलेल्यांचा विवाह झाला तर पुढं अपत्य जन्मावेळी किंवा जन्मानंतर काही क्लिष्टता निर्माण होण्याची शक्यता असते. याची टक्केवारी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नात्यातील लग्न टाळण्याचा सल्ला दिला जातो. त्यातूनही हे लग्न झालेच तर गर्भधारणेनंतर योग्य वैद्यकीय तपासण्या करून बाळाची वाढ तपासणं आवश्यक असते; पण याविषयी पुरेशी माहिती नसल्याने थॅलेसेमियाग्रस्त बाळ जन्माला येते.
थॅलेसेमियावर कायमस्वरूपी उपचार नाही; पण तरीही अनेकजण अंधश्रद्धा म्हणून चटके देऊन हा आजार बरा होतो, असा समज करून आहेत. परिणामी बालकांचे शारीरिक हाल होतात, त्यातून बरं वाटण्याचा उपायच शिल्लक राहत नाही. या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील विविध संस्थांकडून प्रयत्न केले जात आहेत.
- काय आहे थॅलेसेमिया?
थॅलेसेमिया, हिमोफेलिया व सिकलसेल (अॅनेमिया) या रुग्णांच्या अंगात रक्त तयार होत नसल्यामुळे त्यांना जिवंत राहण्यासाठी दर २० दिवसांनी रक्त चढवावे लागते. या रुग्णांचे आर्युमान साधारण ३५ वर्षांचे असते. या कालावधीत सरासरी दीड हजार पिशव्या रक्त रुग्णाला चढवावे लागते.
- असा ओळखावा हा आजार?
सामान्यपणे बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळ लाल चुटूक दिसते. थॅलेसेमिया असलेले बाळ जन्मत:च पांढरे शुभ्र दिसते. वजनाला कमी भरते आणि त्याच्या हालचालीही खूपच मंदावलेल्या असतात.
- आजार टाळण्यासाठी हे करा
जवळच्या नात्यात लग्न करणाऱ्या जोडप्यांना होणारे बाळ हे थॅलेसेमियाग्रस्त असू शकते. अशावेळी गर्भधारणेनंतर तीन महिन्यांच्या आत संबंधितांनी ‘पॅलेमायनर’ तपासणी करणं आवश्यक आहे. या तपासणीत बाळाला तीव्र थॅलेसेमिया असल्याचे निष्पन्न झाल्यास गर्भपात करण्याला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे.
- दहा वर्षांच्या आतच उपचार
थॅलेसेमिया रुग्णांना त्यांच्या रक्तातातील म्हणजेच आई, वडील, बहीण, भाऊ यांचा बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणं हा एकमेव उपचार आहे. मांडीपाशी असणाºया या बोन मॅरो जुळण्याची शक्यता अवघी २० टक्के आहे. तर त्यासाठी साधारण १५ ते २० लाख रुपयांचा खर्च येतो. ही शस्त्रक्रिया दहा वर्षांच्या आतच करावी लागते. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी ‘एचएलए’ ही तपासणी बंधनकारक असून त्यासाठीही मोठा खर्च असतो.
गर्भवती महिलांमध्ये थॅलेसेमियाविषयी जनजागृती करण्यासाठी आम्ही आशा वर्कर्सची मदत घेत आहोत. महिन्यातून एक बैठक घेऊन याविषयी मार्गदर्शन केले जाते. अल्प थॅलेसेमिया असणारे दोघे परस्परांशी विवाह करून निरोगी बाळाला जन्म देऊ शकतात. पण तीव्र थॅलेसेमिया जोडप्यांचे बाळ अभावानेच निरोगी जन्माला येते.
-धनंजय नामजोशी, थॅलेसेमिया निर्मूलन समिती कार्यवाह, कोल्हापूर