बनपुरी-पाटीलवाडीत कोरोनाचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:40 AM2021-04-27T04:40:25+5:302021-04-27T04:40:25+5:30
ढेबेवाडी : कोरोनाचे संकट रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असताना, जनतेतून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने बनपुरी आणि रुवले या दोन्ही ...
ढेबेवाडी : कोरोनाचे संकट रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असताना, जनतेतून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने बनपुरी आणि रुवले या दोन्ही गावात तब्बल छत्तीस कोरोना बाधित रुग्ण सापडले. यामुळे प्रशासनासह गावकऱ्यांचीही झोपच उडाली आहे.
दरम्यान, या रुग्णांच्या संपर्कातील मित्र आणि नातेवाईक यांच्याकडून कोरोना तपासणीसाठी सहकार्य होत नसल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
ढेबेवाडी विभागात बहुतेक गावात कोरोनाने शिरकाव केल्याने, आता गावातील कोरोना दक्षता समित्या पूर्ण क्षमतेने कार्यरत होणे गरजेचे आहे. अनेक गावांमध्ये या समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, शासनाच्या नियमांची पायमल्ली करत कोरोनाला निमंत्रण देत आहेत.
विभागातील मोठे कार्यक्षेत्र असलेल्या बनपुरी अंतर्गत येणारी कंकवाडी, देसाई वस्ती, चांदेकरवस्ती येथे कोरोनाने थैमान घातले आहे. तीन छोट्या वस्त्यांमध्ये २७ कोरोना रुग्ण आहेत. त्यांच्या संपर्कात अनेक जण आले असूनही ते लोक कोरोना चाचणी करण्यासाठी प्रतिसाद देत नाहीत. यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागानेही हात टेकले आहेत. अति संपर्कातील लोकांचे करायचे काय, असे संकट निर्माण झाले आहे.
त्याचबरोबर, रुवले (पाटीलवाडी) येथे छोट्याशा वस्तीत दहा कोरोना रुग्ण सापडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच वस्तीतील एकाचा चार दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यूही झाला होता. यामुळे आरोग्य विभागाने स्वतंत्र यंत्रणा लावून गावातील लोकांमध्ये जागृती केली.
झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाबरोबरच गावकऱ्यांनीही सामोरे जाण्याची गरज असताना समाजातील काही घटकांचा अपेक्षित प्रतिसादच मिळत नसल्याने, कोरोनाचा भडका उडण्याची भीती काही आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली.
चाकरमान्यांचा लोंढा गावाकडे...
या विभागातील गावागावातील घरटी एक-दोन कुटुंब उदरनिर्वाहासाठी मुंबई पुण्यासह इतर शहरामध्ये वास्तव्यास असतात. आता लॉकडाऊन झाल्याने आणि व्यवसाय बंद झाल्याने अनेकांनी गावाकडे धाव घेतली. त्याच्यातून ही संसर्ग वाढल्याचे बोलले जात आहे.