घरावर वीस सीसीटीव्ही लावूनही थांबेना दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 04:02 PM2019-07-08T16:02:45+5:302019-07-08T16:03:44+5:30
सातारा तालुक्यातील नागठाणे येथील जगताप कुटुंबीयांच्या घरावर गेल्या महिनाभरापासून रात्री-अपरात्री दगडफेक होत आहे. त्यामुळे हे कुटुंब भयभीत झाले असून, या कुटुंबाने दगडफेक करणारे शोधण्यासाठी चक्क घरावर वीस सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र तरीही हे प्रकार सुरूच असून, दगडफेक करणारे शोधणे पोलिसांसमोरही मोठे आव्हान आहे.
दत्ता यादव
सातारा : सातारा तालुक्यातील नागठाणे येथील जगताप कुटुंबीयांच्या घरावर गेल्या महिनाभरापासून रात्री-अपरात्री दगडफेक होत आहे. त्यामुळे हे कुटुंब भयभीत झाले असून, या कुटुंबाने दगडफेक करणारे शोधण्यासाठी चक्क घरावर वीस सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र तरीही हे प्रकार सुरूच असून, दगडफेक करणारे शोधणे पोलिसांसमोरही मोठे आव्हान आहे.
नागठाणे येथे राजेंद्र दिनकर जगताप (वय ४८) यांचा छोटासा व्यवसाय असून, हे कुटुंब गुण्यागोविंदाने राहत आहे. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून या कुटुंबाची अक्षरश: झोप उडाली आहे. एके दिवशी मध्यरात्री अचानक त्यांच्या घरावर दगडफेक झाली. घराबाहेर येऊन त्यांनी कानोसा घेतला असता बाहेर कोणीच दिसले नाही.
खोडसाळपणे कुणीतरी हे कृत्य केले असेल, असे समजून जगताप यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, या घटनेच्या दुसऱ्या दिवसांपासून घरावरील दगडफेकीचे प्रमाण वाढले. इतके वाढले की, दिवसाही त्यांच्या घरावर दगडफेक होऊ लागली. हा नेमका काय प्रकार आहे, हे जगताप कुटुंबीयांना समजेनासे झाले. त्यामुळे त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांच्या कानावर हा प्रकार घातला.
पोलिसांनी अज्ञातावर अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर जगताप घरी आले. त्यानंतर मात्र दगडफेकीचे प्रमाण पहिल्यापेक्षा आणखीनच दुपटीने वाढले. रात्री-अपरात्री केव्हाही दगडफेक होत असल्यामुळे जगताप कुटुंबाची पुरती झोप उडाली. आता कुठे पोलिसांनी थोड गांभीर्याने घेतलं होतं. पोलीस तपासासाठी दिवसा घरात आले. त्याचवेळी पुन्हा पोलिसांसमक्ष चक्क दगडफेक झाली. यामुळे पोलिसांना दगडफेकीची खातरजमा झाली.
जगताप यांच्या दारात पडलेला दगड घेऊन पोलीस निघून गेले. आता नक्कीच तपास लागेल, अशा आशेवर कुटुंबीय असतानाच दगडफेक काही थांबता थांबेना. सरतेशेवटी आपल्यालाच काही तरी केले पाहिजे, हे राजेंद्र जगताप यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्याजवळ साठवलेली पुंजी खर्च करून सुरुवातीला पाच सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी केले.
घरावर सुरक्षा कवच असल्यामुळे आता दगडफेक करणारा सापडेल, अशी धारणा होती, त्यामुळे ते काही दिवस निर्धास्त राहिले; परंतु पुन्हा हे प्रकार सुरू झाले. पोलीस ठाण्यात पुन्हा त्यांनी धाव घेतल्यानंतर त्यांना कोणावर तुमचा संशय आहे का, तुमची कोणाची दुश्मनी आहे का, असे पोलिसांकडून प्रश्न विचारण्यात आले. परंतु जगताप यांनी कोणाशीही वाद नसल्याचे सांगितले, त्यामुळे याचे गूढ वाढलेय.
पाचचे वीस झाले !
जगताप यांनी सुरुवातीला पाच सीसीटीव्ही कॅमेरे लावूनही दगडफेक व्हायची ती होतच राहिली. त्यामुळे एकेक कॅमेरा वाढवत त्यांनी असे वीस कॅमेरे घराच्या आजूबाजूने लावले. आता तरी दगडफेक थांबेल, असे वाटत असतानाच दगडफेक सुरूच आहे. त्यामुळे त्यांनी पोलीस अधीक्षकांसमोरही हा प्रकार कथन केलाय. मात्र, तरीसुद्धा दगडफेक सुरूच आहे.
तुमचा खेळ संपला !
जगताप कुटुंबाच्या घरावर दगडफेक करण्यात येत आहेच, आत्तापर्यंत पाच चिठ्ठ्याही त्यांच्या घराजवळ टाकण्यात आल्या आहेत. तुमचा खेळ संपला.. तुम्हाला जीवे मारणार, असा त्यात उल्लेख आहे. त्यामुळे कुटुंबीय आणखीनच चिंताग्रस्त झाले. टाकीमध्ये पाणी आहे का, हे पाहण्यासाठी गेलेला जगताप यांचा मुलगा राहुल याच्या हातावर दगड पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता.