सरकारच्या इच्छाशक्तीमुळेच मराठ्यांना आरक्षण, उदयनराजेंची फडणवीसांवर स्तुतिसुमने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 02:02 PM2018-12-23T14:02:45+5:302018-12-23T14:02:58+5:30
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत.
सातारा- राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. मराठा आरक्षणाचा धाडसी निर्णय सध्याच्या शासनानं घेतलेला आहे, असं उदयनराजे म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न मागेच मार्गी लागायला हवा होता. मागील सरकारच्या काळात ते का झाले नाही, हे माहीत नाही.
मात्र भाजप सरकारची इच्छाशक्ती असल्याने हे आरक्षण मिळाले, असंही ते म्हणाले आहेत. सरकारला लोकांकडून पोचपावती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. बोलण्यापेक्षा करणं महत्त्वाचं असतं, बोलणारे भरपूर असतात, पण करणारे मोजकेच असतात. शेवटी समाजाचं जे लोक हित जोपासतात, अशाच नेत्यांच्या लोक पाठीशी उभे राहतात, असंही ते म्हणाले आहेत.
साताऱ्यातील रखडलेल्या कामांबाबतही उदयनराजे यांनी मुद्दे उपस्थित केले. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे काम करण्यासाठी आ. शिवेंद्रराजे यांनीही पाठपुरावा केल्याचे उदयनराजे यांनी सांगितल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. शेंद्रे कागल रस्त्याचे कामही सुरू करावे, सुरुर महाबळेश्वर पोलादपूर रस्ता रूंदीकरण करावे, बोंडारवाडीचे धरण होणे गरजेचे आहे, कास धरणाच्या कामासाठी ५० कोटी द्यावे, मेडिकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लावावा, संग्रहालयाला ५ कोटी द्यावेत हे काम पुरातत्त्व विभागाकडून बांधकाम विभागाकडे द्यावे, अशा मागण्याही खासदार उदयनराजे भोसले यांनी फडणवीस सरकारकडे केल्या आहेत.