कऱ्हाडकर मठाच्या मठाधिपतीला सक्तमजुरी, विश्वस्तांवर केला होता जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 04:19 PM2023-02-15T16:19:55+5:302023-02-15T16:20:15+5:30
मठाचे अध्यक्ष तथा विश्वस्त यशवंत माने यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बाजीराव कऱ्हाडकर याला अटक करण्यात आली होती.
कऱ्हाड : येथील मारुतीबुवा कऱ्हाडकर मठाच्या विश्वस्तांच्या डोक्यात वीणा घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मठाचा तत्कालीन मठाधिपती बाजीराव भागवत जगताप (वय ३७, मूळ रा. कोडोली, ता. कऱ्हाड) याला न्यायालयाने दोषी धरून सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. कऱ्हाडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रविकांत साखरे यांनी मंगळवारी ही शिक्षा सुनावली.
कऱ्हाड शहरातील मारुतीबुवा मठाचे विश्वस्त व अध्यक्ष यशवंत दाजी माने हे २३ एप्रिल २०१९ रोजी मठामध्ये असताना बाजीराव कऱ्हाडकर हा आरडाओरडा करीत त्या ठिकाणी आला. तेथे असलेली लाकडी वीणा उचलून घेतली. तसेच दिंडी कशी काढता ते बघतो, असे म्हणत तेथील लोकांशी वाद घातला. त्यावेळी मठाचे अध्यक्ष यशवंत माने यांच्याकडे पाहून तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणत त्याने वीणा त्यांच्या डोक्यात घातली. त्यामध्ये यशवंत माने हे गंभीर जखमी झाले.
या खटल्यात सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी बाजीरावमामा कऱ्हाडकर याला या गुन्ह्यात दोषी धरून सात वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
जामिनावर असताना खून !
मठाचे अध्यक्ष तथा विश्वस्त यशवंत माने यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बाजीराव कऱ्हाडकर याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला असताना त्याने मठाधिपती जयवंत पिसाळ यांचा खून केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्या गुन्ह्यात तो सध्या बंदी कैदी म्हणून कोठडीत आहे.