जालन्यातील वकिलाच्या खून प्रकरणातील आरोपीला साताऱ्यात अटक, गुन्हा घडल्यापासून होता फरारी

By दत्ता यादव | Published: October 10, 2022 05:06 PM2022-10-10T17:06:34+5:302022-10-10T17:18:57+5:30

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घडवून आणला होता गॅस सिलेंडरचा स्फोट

The accused in Jalanya lawyer murder case was arrested in Satara, he was absconding since the crime was committed | जालन्यातील वकिलाच्या खून प्रकरणातील आरोपीला साताऱ्यात अटक, गुन्हा घडल्यापासून होता फरारी

जालन्यातील वकिलाच्या खून प्रकरणातील आरोपीला साताऱ्यात अटक, गुन्हा घडल्यापासून होता फरारी

Next

सातारा: जालना येथील वकील किरण लोखंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी विकास गणेश मस्के याला साताऱ्यात अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथे राहणाऱ्या मनीषा किरण लोखंडे यांचा विवाह ॲड किरण लोखंडे यांच्याशी मे 2022 मध्ये झाला होता. अवघ्या चार महिन्यातच त्या दोघांमध्ये भांडणे वाढली. त्यामुळे मनीषा किरण लोखंडे हिने तिचा साथीदार गणेश मिठू आगलावे (रा. वाल्हा, ता. बदनापूर जिल्हा जालना), विकास गणेश मस्के (रा. आनंदनगर अजंठा कॉलेज पाठीमागे जालना) यांच्या मदतीने 31 ऑगस्ट 2022 रोजी मध्यरात्री ॲड किरण लोखंडे यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण करून त्यांचे नाक व तोंड दाबून त्यांचा खून केला.

त्यानंतर मृतदेह घरामध्ये ठेवून ते निघून गेले. दरम्यान 1 सप्टेंबर 2022 रोजी दोघे पुन्हा घरी आले. मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार करीत असताना त्यांनी स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडरची पाईप काढून रेगुलेटर चालू ठेवून काडी लावली. त्यामुळे गॅसने पेट घेतला. मोठा स्फोट झाल्याने वकील किरण लोखंडे यांचा मृतदेह जळाला असल्याचा दोघांनी बनाव केला होता. पतीचा मृत्यू झाल्याबाबत पत्नीने पोलिसांना माहिती दिल्याने याबाबत अकस्मात मृत्यू रजिस्टर नोंद करण्यात आला होता.

परंतु घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना संशय आला होता. हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी अखेर वकील किरण लोखंडे यांच्या खून प्रकरणात त्यांची पत्नी मनीषा लोखंडे व तिचा साथीदार गणेश आगलावे याला जालना पोलिसांनी अटक केली होती.

परंतु, यातील आरोपी विकास मस्के हा गुन्हा घडल्यापासून फरारी होता. सातारा शहरातील मोळाचा ओढा  परिसरात रविवारी रात्री असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गरजे यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार केले. या पथकाने मोळाचा ओढा परिसरात जाऊन सापळा रचून विकास मस्के याच्या मुस्क्या आवळल्या. त्यानंतर त्याला स्थानिक गुन्हे शाखेत आणण्यात आले. पुढील कारवाईसाठी त्याला जालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: The accused in Jalanya lawyer murder case was arrested in Satara, he was absconding since the crime was committed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.