Satara: दुचाकीवरून विकत होता गांजा, कऱ्हाड शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपीस घेतले ताब्यात
By संजय पाटील | Published: September 5, 2023 01:31 PM2023-09-05T13:31:31+5:302023-09-05T13:38:23+5:30
एक किलो गांजासह दुचाकी जप्त
कऱ्हाड : शहरातील बुधवार पेठेत दुचाकीवरून सुरू असलेल्या गांजा तस्करीचा पोलिसांनी भांडाफोड केला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्याकडून एक किलो गांजाचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. गणेश संजय वायदंडे (रा. बुधवारपेठ, कऱ्हाड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाड शहरात दुचाकीवरून एकजण लोकांना गांजा पुरवत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला सापळा रचून संशयिताच्या हालचालींवर नजर ठेवण्याच्या सुचना दिल्या. दरम्यान, कृष्णा नाका परिसरात संशयित युवक गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस सतर्क झाले.
उपनिरीक्षक राजू डांगे, प्रविण जाधव, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, पोलीस हवालदार शशिकांत काळे, संतोष पाडळे, कुलदीप कोळी, महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, रईस सय्यद, सोनाली पिसाळ या पथकाने संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडे झडती घेतली. गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये एक किलो गांजाचा साठा आढळून आला. पोलिसांनी गाडीसह संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. संशयित वायदंडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले असून या परिसरात आणखी काही संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.