Satara: यवतेश्वर घाटातील धोकादायक दगडाचा ‘कडेलोट’, मुसळधार पावसातही प्रशासनाची कार्यवाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 03:49 PM2023-07-25T15:49:32+5:302023-07-25T15:49:43+5:30

धोका टाळण्यासाठी जागेवरच फोडली नाही

The administration demolished the dangerous stone in Yavateshwar Ghat even in heavy rain | Satara: यवतेश्वर घाटातील धोकादायक दगडाचा ‘कडेलोट’, मुसळधार पावसातही प्रशासनाची कार्यवाही

Satara: यवतेश्वर घाटातील धोकादायक दगडाचा ‘कडेलोट’, मुसळधार पावसातही प्रशासनाची कार्यवाही

googlenewsNext

सातारा : सातारा तालुक्यातील सांबरवाडी हद्दीतील यवतेश्वर घाटातील धोकादायक महाकाय दगडाचा अखेर सोमवारी सकाळी कडेलोट करण्यात आला. मुसळधार पाऊस सुरू असूनही प्रशासनाने जोखीम पत्करली. कड्याखाली सुमारे ४० फूट दरड होती. कड्याच्या टोकावर पोकलेन उभा करून ऑपरेटरने कौशल्य पणाला लावून तासाभरातच ती पाडून टाकली.

जुलैच्या सुरुवातीलाच घाटात दोन महाकाय दगड कोसळले होते. यानंतर आणखी मोठा सुळका निसटण्याच्या स्थितीत असल्याचे बांधकाम विभागाच्या पाहणीत आढळून आले. या भागातील नागरिकांतूनही धोकादायक दरड पाडण्याची मागणी होत होती. त्यामुळे ही दरड पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा आणि तहसील प्रशासनाच्या मार्फत सोमवारी सकाळी ९ वाजता दरड पाडण्याचा दिवस निश्चित केला. खबरदारी म्हणून रविवारी रात्री १२ वाजल्यापासून सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत बोगदा ते यवतेश्वर - कास रस्ता सर्वप्रकारच्या वाहतुकीस पूर्णपणे बंद करण्यात आला. बोगद्याजवळ पोलिसांनी बॅरिगेटस लावून कासकडे जाणाऱ्या वाहनांना माघारी पिटाळले.

दगड पाडताना मुसळधार पाऊस सुरू असला तरी प्रशासनाने जोखीम घेत सकाळी ९ वाजता पोकलेन सांबरवाडी मार्गे दरडीजवळ नेला. महाकाय दगड कड्यापासून सुमारे चाळीस फूट खाली होता. त्यामुळे पोकलेन ऑपरेटरने मशीनचा ५० फूट लांब लोखंडी हात दरडीला घातला. कड्याच्या टोकावरून हे कठीण काम करण्यासाठी तासभरात त्याला दोनदा जागा बदलावी लागली. यानंतर ही धोकादायक दरड खाली काेसळून यवतेश्वर घाटरस्त्यावर आदळली व कठडा तोडून खाली पायथ्याला जावून विसावली. या दरडीचे मोठमोठाले दगड घाटात थांबलेल्या जेसीबीने खाली लोटून देण्यात आले. अनेक दिवसांपासून वाहन चालकांच्या डोक्यावर काळ बनून थांबलेल्या दरडीचा अखेर कडेलोट झाला. प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार राजेश जाधव, बांधकाम विभागाचे प्रशांत खैरमोडे आदींनी प्रत्यक्ष जागेवर जावून परिस्थिती हाताळली.

पोलिसांचा बंदोबस्त, रुग्णवाहिका

दरड फोडण्याची कार्यवाही सुरु असताना, या ठिकाणापासून कमीतकमी ३०० मीटर परिसरात प्रवेशास मनाई करण्यात आली. कोणत्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये म्हणून महादरे गावाच्या दक्षिणेकडील बाजूस शेतीच्या कामाकरिता, गुरे राखण्याकरिता व इतर कारणासाठी नागरिकांना जाण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली होती. पोलिस बंदोबस्त, पोकलेन, जेसीबी, डंपर, रुग्णवाहिका आदी जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात आली होती.

धोका टाळण्यासाठी जागेवरच फोडली नाही

येवतेश्वर घाटातील धोकादायक महाकाय दगड जागेवर फाेडण्याबाबत बांधकाम विभागाकडून चाचपणी करण्यात आली होती. परंतु, कड्यापासून ४० फूट खाली असलेली दरड पाडताना पोकलेन दरीत कोसळण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. त्यामुळे ती खाली ढकलून द्यावी लागली. त्यामुळे घाटरस्त्याचे मोठे नुकसान झाले. त्याठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

Web Title: The administration demolished the dangerous stone in Yavateshwar Ghat even in heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.