कृषी विभागाचा दणका; सातारा जिल्ह्यात १५ दुकाने निलंबित, तीनचा परवाना रद्द 

By नितीन काळेल | Published: June 19, 2024 05:45 PM2024-06-19T17:45:41+5:302024-06-19T17:46:57+5:30

खरीप हंगाम : १२ भरारी पथकाचा वाॅच; तपासणीत दोषी आढळल्यास थेट कारवाई 

the agriculture department has suspended the license of 15 shops and canceled three permanently In Satara district | कृषी विभागाचा दणका; सातारा जिल्ह्यात १५ दुकाने निलंबित, तीनचा परवाना रद्द 

संग्रहित छाया

सातारा : जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज असून खते, बियाणे, किटकनाशकांबात फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागही सतर्क आहे. यासाठी कृषी निविष्ठा दुकानांवर वाॅच ठेवण्यासाठी १२ भरारी पथके कार्यरत आहेत. कृषी विभागाने आतापर्यंत तपासणीत दोषी आढळलेल्या १५ दुकानांचा परवाना निलंबीत तर तीनचा कायमस्वरुपी रद्द केला आहे. त्यामुळे दुकानदारांत खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा असतो. यंदा खरीपाचे सर्वसाधारणपणे २ लाख ९० हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे. यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र सुमारे ७५ हजार हेक्टर राहणार असून यानंतर बाजरीचे ६० हजार, भात ४४ हजार, खरीप ज्वारीचे ११ हजार, भुईमूग २९ हजार आणि मकेचे १५ हजार हेक्टर क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे. तर इतर पिकांचे क्षेत्र अत्यल्प आहे.

या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागही सज्ज झाला आहे. कारण, शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि किटकनाशके लागतात. यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाच्यावतीने लक्ष ठेवण्यात येते. आताही कृषी विभागाने दुकानांची तपासणी करुन कारवाईस सुरूवात केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यासही दुकानांची तपासणी करण्यात येत आहे.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर एक महिन्यात भरारी पथकाने कारवाई केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ कृषी निविष्ठा दुकानांचे निलंबन करण्यात आले आहे. तर तीनचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला आहे. रद्द झालेले तीनही दुकाने ही पाटण तालुक्यातील आहेत. तर निलंबितमधील १४ दुकाने ही पाटण तर एक कऱ्हाड तालुक्यातील आहे.

या कारणासाठी दुकानांचे निलंबन अन् परवाना रद्द..

दुकानचालकांनी रेकाॅर्ड अद्ययावत न ठेवणे, पाॅश मशिन आणि स्टाॅक रजिस्टरमध्ये तफावत आढळणे, कृषी विभागाच्या नोटीसीस उत्तर न देणे, सुनावणीवेळी कागदपत्रे योग्य पद्धतीने सादर न करणे आदी कारणांमुळे कृषी निविष्ठा दुकानांवर कारवाई झाल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.

खरीप हंगामासाठी खते आणि बियाणे मुबलक आहे. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी १२ भरारी पथकांचा कृषी निविष्ठा दुकानांवर वाॅच असणार आहे. पथके अचानक भेट देऊन तपासणी करत आहेत. तर आतापर्यंत १५ कृषी निविष्ठा दुकानांचे निलंबन तर तीनचा परवाना रद्द करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: the agriculture department has suspended the license of 15 shops and canceled three permanently In Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.