रयत साखर कारखाना निवडणूक: "त्या"अपात्र उमेदवारांचे आपिल फेटाळले, बिनविरोधचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 07:08 PM2022-07-08T19:08:03+5:302022-07-08T19:08:35+5:30
विद्यमान अध्यक्ष अँड.उदयसिंह पाटील व त्यांचे चुलत बंधू अँड. आनंदराव पाटील यांनी परस्पर विरोधी पॅनेल निवडणूक रिंगणात
कराड : शेवाळवाडी (ता. कराड) येथील रयत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 24 जुलै रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष अँड.उदयसिंह पाटील व त्यांचे चुलत बंधू अँड. आनंदराव पाटील यांनी परस्पर विरोधी पॅनेल रिंगणात उतरवली आहेत.
उदयसिंह पाटील गटाने विरोधी गटाच्या अर्जावर हरकती घेतल्याने त्यांचे काही अर्ज अवैध ठरले आहेत. पैकी 6 उमेदवारांनी साखर आयुक्त पुणे यांच्याकडे दाद मागितली होती. त्याची आज मंगळवारी साखर सहसंचालक धनंजय डोईफोडे यांचे समोर सुनावणी झाली. त्याचा आज निकाल दिला आहे. त्या 6 जणांचे आपिल फेटाळण्यात आले आहे.
या कारखान्याची निवडणूक नेहमीच बिनविरोध झाली आहे. मात्र राजकीय स्थित्यंतरे झाल्याने यावर्षी प्रथमच निवडणूक होत आहे. त्यासाठी माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे वारसदार अँड. उदयसिंह पाटील व कारखान्याचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील यांचे पुत्र अँड.आनंदराव पाटील हे दोन चुलत भाऊ आमने-सामने ठाकले आहेत.
कारखान्या निवडणूक अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी, कराडचे उपनिबंध संदीप जाधव यांच्यासमोर झाली. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हरकत घेण्यात आली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अँड. आनंदराव पाटील गटाचे काही अर्ज अवैध ठरवले. त्यामुळे अँड. उदयसिंह पाटील यांच्या पॅनेलच्या काही उमेदवारांचा बिनविरोध चा मार्ग मोकळा झाला आहे.
मात्र यातील दिनकर महादेव यादव (नारायणवाडी) कृष्णत भीमराव देसाई (तांबवे) बापू मारुती निंबाळकर (वसंतगड) निवास किसन देसाई (आणे)राजेंद्र बाबुराव पाटील (कुठरे)सुहास दत्तात्रय पाटील(म्होप्रे) या 6 उमेदवारांनी साखर आयुक्त पुणे यांच्याकडे अपील केले होते.
दरम्यान साखर आयुक्त कार्यालयात याबाबतची सुनावणी 5 जुलै रोजी झाली. साखर सहसंचालक धनंजय डोईफोडे यांनी ते ऐकून घेऊन सुनावणी पूर्ण केली.मात्र निकाल राखून ठेवला होता. दरम्यान आज धनंजय डोईफोडे यांनी यांचा निकाल जाहीर केला असून त्या 6 जणांचे आपिल फेटाळण्यात आले आहे .त्यामुळे उदयसिंह पाटील गटाच्या ६ उमेदवारांचा बिनविरोध चा मार्ग मोकळा झाला आहे.
रयत सहकारी साखर कारखाना निवडणुकी संदर्भातील 6 उमेदवारांनी दाखल केलेल्या अपिलाची सुनावणी माझ्यासमोर पूर्ण झाली. मात्र ती आपील फेटाळण्यात आली आहेत. - धनंजय डोईफोडे प्रादेशिक सहसंचालक (साखर)