साताऱ्यासह परिसराला दुसऱ्या दिवशीही वळीव पावसाने झोडपले
By नितीन काळेल | Published: May 11, 2024 04:25 PM2024-05-11T16:25:33+5:302024-05-11T16:25:58+5:30
ढगांच्या गडगडाटात हजेरी : जोरदार वारे; शहरातील वीजपुरवठा खंडित
सातारा : सातारा शहरासह परिसराला सलग दुसऱ्या दिवशी वळीव पावसाने झोडपले. ढगांच्या गडगडाटात जोरदार हजेरी लावली. यावेळी वारेही वाहत होते. त्यामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तर पावसामुळे पारा घसरला असल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात मे महिना सुरू झाल्यापासून पारा वाढला होता. रखरखीत ऊन पडत होते. सातारा शहरात तर बहुतांशी वेळा तापमान हे ४० अंशावर राहिले. त्यामुळे उष्णतेची लाट आल्याचे चित्र होते. परिणामी नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. असे असतानाच दोन दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होत असून अनेक ठिकाणी वळवाचा पाऊस हजेरी लावू लागला आहे.
शुक्रवारी सातारा शहरासह परिसरात पाऊस झाला. तसेच पाटण तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे पाटण तालुक्यात शाळा, घरावरील पत्रे उडून गेले. लोकांचे नुकसान झाले. तर शनिवारीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. सातारा शहरातील काही भागात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हलक्या सरी पडल्या. तर पावणे चार वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात पाऊस झाला.
विशेषता शहराच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडला. यावेळी जोरदार वारे वाहत असल्याने झाडे हलकावे खात होती. त्यातच वीजपुरवठा खंडित झाला होता. शहरात अवघा दहा मिनिटे पाऊस झाला तरी वातावरणात गारवा निर्माण झाला होता.