'बावधनचं बगाडं' काशीनाथाचं चांगभलंच्या गजरात उत्साहात, यात्रेत उधळला बैल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 05:13 PM2022-03-22T17:13:17+5:302022-03-22T18:50:33+5:30

कोरोनामुळे दोन वर्षापासून बगाड यात्रेवर बंधने होती. मात्र मागील वर्षी गावकऱ्यांनी गनिमी काव्याने बगाड यात्रा साजरी करत बगाड मिरवणूक काढली होती.

The Bagad Yatra at Bawadhan in Satara was celebrated with great enthusiasm on Tuesday | 'बावधनचं बगाडं' काशीनाथाचं चांगभलंच्या गजरात उत्साहात, यात्रेत उधळला बैल

'बावधनचं बगाडं' काशीनाथाचं चांगभलंच्या गजरात उत्साहात, यात्रेत उधळला बैल

Next

पाचवड : साताऱ्यातील बावधन येथील बगाड यात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडली. काशीनाथाचं चांगभलंचा गजर करीत यात्रेसाठी हजारो भाविक आणि यात्रेकरूंनी बावधन (ता. वाई) येथे उपस्थिती लावली. सकाळी १० च्या सुमारास बगाड्याला बगाडावर चढवून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली. यात्रेत मध्येच बैल उधळल्याच्या घटना घडल्या. पण कोणतेही नुकसान झाले नाही.

मागील दोन वर्षापासून बगाड यात्रेवर काही बंधने होती. सन २०२० मध्ये टाळेबंदी जाहीर होण्यापूर्वीच बगाड यात्रा झालेली होती, तर मागील वर्षीच्या यात्रेला बंदी घातलेली असतानाही गावकऱ्यांनी गनिमी काव्याने बगाड यात्रा साजरी करत बगाड मिरवणूक काढली होती. यावर्षी खुल्या वातावरणात बगाड यात्रा भरत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठा उत्साह होता. बगाड मिरवणूक पाहण्यासाठीही मोठ्या संख्येने यात्रेकरू जमा झाले होते. सर्व शिवार आणि रस्ते बगाड ओढणारे बैल आणि यात्रेकरू ग्रामस्थांच्या गर्दीने फुलून गेले होते.

होळी पौर्णिमेच्या दिवशी बावधन (ता. वाई) येथील भैरवनाथ मंदिरात यावर्षीचा बगाड्या निवडण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. यावर्षीचा बगाडाचा मान बाळासाहेब मांढरे यांना मिळाला आहे. मागील पाच दिवसापासून ते गावातील सर्व मंदिरात पूजा करून मंदिरातच मुक्कामाला आहेत. सोमवारी रात्री बावधन येथे शेकडो ढोल ताशांच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत मोठी छबिना मिरवणूक निघाली होती. या छबिण्यात मोठ्या संख्येने ग्रामस्थ यात्रेकरू सहभागी झाले होते.

सकाळी बगाड्याला आणि बगाडाचा रथ कृष्णा नदीच्या तीरावर सोनेश्वर येथे आणण्यात आला. तिथे ग्रामदेवतेची पूजा झाल्यानंतर सकाळी १० च्या सुमारास बगाड्याला बगाडावर चढविण्यात आले आणि सशक्त बैलांच्या मदतीने दगडी चाकांचे बघाड ओढून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली. शिवारनिहाय व भावकीनिहाय ठिकठिकाणी १२ ते १६ बैल जुंपून अडीच-तीन टन वजनाचा बगाडाचा रथ शेत शिवारातून ओढून बावधन गावात भैरवनाथ मंदिराकडे आणला जातो. सर्व बलुतेदारांनाही यात सहभागी करून घेतले जाते. यावर्षी कोरोना निर्बंध उठल्यानंतर यात्रा होत असल्याने यात्रेसाठी हजारो भाविकांनी व यात्रेकरूंनी बगाड यात्रा पाहण्यासाठी गर्दी केली आहे.

दरम्यान, अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, वाईच्या पोलीस उपाधीक्षक डॉ. शीतल जानवे, खराडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनात मोठा पोलीस बंदोबस्त याठिकाणी नेमण्यात आला आहे. सातारा जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय पथक याठिकाणी दाखल करण्यात आले होते. वाई-सातारा रस्त्यावर विविध खाद्य पदार्थ, खेळण्यांची दुकानेही थाटण्यात आली होती.

Web Title: The Bagad Yatra at Bawadhan in Satara was celebrated with great enthusiasm on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.