साताऱ्यातील गोडोली येथील 'बांबूच्या मतदान केंद्रा'ने वाढविला मतदारांचा उत्साह
By दीपक शिंदे | Published: May 7, 2024 04:55 PM2024-05-07T16:55:02+5:302024-05-07T17:04:39+5:30
मतदानानंतर प्रत्येकाला दिले बांबूचे एक रोप
सातारा : बाहेरुन पाहिल्यानंतर एखाद्या हॉटेलमध्ये प्रवेश करावा असे वाटणारे हे मतदान केंद्र साताऱ्यातील गोडोली येथे तयार करण्यात आले आहे. हे मतदान केंद्र सर्वच मतदारांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मतदान दुसऱ्या बूथवर असले तरी प्रशासनाने तयार केलेले हे अनोखे मतदान केंद्र पाहण्यासाठीही लोक याठिकाणी येत आहेत. मतदानानंतर प्रत्येकाला बांबूचे एक रोप देऊन मतदारांचा उत्साह वाढविण्याचेही काम होत आहे.
सातारा शहरातील गोडोली याठिकाणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या संकल्पनेतून बांबूचे मतदान केंद्र बनविण्यात आले आहे. त्याचे प्रवेशद्वारही बांबूंच्या काठ्यापासून बनविण्यात आल्याने ते एखादे हॉटेल असल्यासारखा भास सुरुवातीलाच होतो. मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी या मतदानकेंद्रात प्रवेश केल्यानंतर पायाखाली रेड कार्पेड आणि डोक्यावर बांबूचेच छप्परही करण्यात आले आहे. दोन्ही बाजूला बांबूपासून बनविलेल्या सूप, सूपड्या, पाट्या लावण्यात आल्या असून याचा कॉरिडॉरही बांबूच्या काठ्यापासून तयार करण्यात आला आहे. एखाद्या पूलावरूनच मतदानकेंद्रात प्रवेश केल्यासारखे याठिकाणी वाटते.
मतदानासाठी रांग असली तरी सावलीची व्यवस्था प्रशासनाने केल्यामुळे लोकांना उन्हाचा त्रास झाला नाही. बाहेरुन अगदी डोक्यावर छत्री आणि चेहरा झाकून आलेले मतदार मतदान केंद्रात आल्यानंतर त्यांना अधिक थंडावा मिळत असल्याचे जाणवत होते. यामुळेच तरुण आणि वृद्धांनीही मतदान करण्यावर अधिक भर दिला आणि प्रशासनाचा हेतू साध्य झाला.
बांबूचे घर अन् बांबूचे मतदानकेंद्र
पायाखाली रेडकार्पेट आणि डोक्यावर बांबूंचे छत, त्यातून अलगद चेहऱ्यावर पडणारी सूर्यकिरणे मतदारांचा उत्साह आणिखी वाढवत असतात. याच वातावरणात आपण मतदान केंद्रात प्रवेश करतो. त्यावेळी आजूबाजूला बांबूंचे आकाशकंदील लक्ष वेधून घेतात. गोल, चौकोनी आणि षटकोनी आकाराचे हे आकाशकंदील अत्यंत सुंदर कलाकुसरीच्या सहाय्याने बनविलेले आहेत.
सातारा जिल्ह्यात बांबू लागवडीचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठीअधिक लक्ष दिले आहे. जास्तीत जास्त रिकामा परिसर हा बांबू लागवडीखाली यावा असा उद्देश आहे. त्याबरोबरच बांबूचे फायदेही अनेक आहेत. ते लोकांना कळावे यासाठी गोडोली येथे एक वैशिष्ट्यपूर्ण असे मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. यामध्ये जास्तीत जास्त बांबूचा वापर करुन ते सजविण्यात आले आहे. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा