साताऱ्यात महायुतीमध्ये ठिणगी; राष्ट्रवादी म्हणते भाजप नेतृत्व विश्वासात घेत नाही
By नितीन काळेल | Published: April 20, 2024 07:06 PM2024-04-20T19:06:54+5:302024-04-20T19:07:37+5:30
साधू चिकने यांचा आरोप : ..तर पुढील कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचा दिला इशारा
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अर्ज दाखल केला. मात्र, याच महायुतीत सहभागी राष्ट्रवादीस सातारा विधानसभा मतदारसंघातील भाजप नेतृत्वाकडून विश्वासात घेतले जात नाही, असा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे जावळी तालुकाध्यक्ष साधू चिकणे यांनी केला आहे. तसेच यापुढेही विश्वासात न घेतल्यास कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचा इशाराही दिला आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात साधू चिकणे यांनी म्हटले आहे की, राज्यात महायुती एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढवीत आहे. मात्र, सातारा लोकसभेत येणाऱ्या सातारा आणि जावळी तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेसला सातारा विधानसभा मतदारसंघातील भाजप नेतृत्व कोणत्याही गोष्टीत विश्वासात घेत नाही. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त करण्यात आली. तरीही दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना अद्यापही विश्वासात घेण्यात आलेले नाही.
महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे जावळी तालुक्यातील भूमिपुत्र आहेत. त्यांच्याबाबत स्थानिक मतदारांमध्ये चांगली भावना आहे. असे असताना भाजप नेतृत्वास जावळी तालुक्यात अधिकचे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. मात्र, भाजप नेतृत्वाकडून हे होताना दिसून येत नाही. याचा प्रत्यय शेंद्रे येथील महायुतीच्या मेळाव्यातही पाहायला मिळाला. तरीही भाजप नेतृत्वाकडून राष्ट्रवादी सातारा तालुका अध्यक्ष आणि जावळी तालुकाध्यक्ष तसेच दोन्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी कोणताही सुसंवाद केला जात नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. याचा फटका महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना बसू शकतो, असा इशाराही पत्रकाद्वारे देण्यात आलेला आहे.
पदाधिकाऱ्यांचा यथायोग्य सन्मान राखला जाईल
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती एकसंघ आहे. नुकताच भाजपा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी अर्ज भरला आहे. अर्जांची छाननी झाली असून, आता खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचाराला सुरूवात होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसात महायुतीतील प्रत्येक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक होईल. त्यानंतर प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा यथायोग्य सन्मान राखला जाईल. त्याचबरोबर त्यांना जबाबदारीही देण्यात येणार आहे. - धैर्यशील कदम, जिल्हाध्यक्ष, भाजपा