सांगलीतील उद्योजकाच्या मुलाचा मृतदेह नीरा नदीत आढळला
By दत्ता यादव | Published: November 7, 2022 06:07 AM2022-11-07T06:07:44+5:302022-11-07T06:08:19+5:30
सांगली येथील प्रसिद्ध उद्योजक सुमेध शहा यांचा मुलगा साैमित शहा (वय २३) याचा शिरवळजवळील निरा नदीच्या पात्रात रविवारी सकाळी साडेआठ वाजता मृतदेह आढळून आला.
सातारा :
सांगली येथील प्रसिद्ध उद्योजक सुमेध शहा यांचा मुलगा साैमित शहा (वय २३) याचा शिरवळजवळील निरा नदीच्या पात्रात रविवारी सकाळी साडेआठ वाजता मृतदेह आढळून आला. ही आत्महत्या आहे की घातपात, याबाबत शिरवळ पोलीस तपास करत असून, या घटनेची शिरवळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साैमित शहा (रा. पटेल चाैक, हायस्कूल रोड, सांगली) हा शनिवारी दुपारी चार मित्रांसोबत कारने पुण्याला गेला. रात्री साडेनऊ वाजता पुण्यातील एका हाॅटेलमध्ये सर्व मित्र जेवण करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी साैमितने मित्रांना पाच मिनिटांत येतो, असे सांगून तो कार घेऊन निघून गेला. तो बराच वेळ झाला आला नाही. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याच्या सांगलीतील घरी या प्रकाराची माहिती दिली.
दरम्यान, नातेवाईकांनी रात्री उशिरा सौमितचा शोध सुरु केला. मात्र, तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी निरा नदीच्या पात्रात साैमितचा मृतदेह आढळून आला. यामुळे शहा कुटुंबीयांना याचा जबर मानसिक धक्का बसला. घटनास्थळी शहा कुटुंबीय तत्काळ पोहोचले. सांगली शहरात सुनील फ्लेक्स प्रिटिंग असा त्यांचा व्यवसाय आहे. साैमितच्या मृत्यूमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे.
त्याचा शेवटचा ‘हेल्प’ असा मेसेज
पुण्यात सोडलेल्या मित्रांनी रात्री उशिरा सौमितला फोन केला. त्यावेळी त्याचा आवाज घाबरलेल्या स्थितीत होता. त्यानंतर तर त्याने ‘हेल्प’असा मेसेज त्यांच्या मित्रांना पाठवल्याचे समजते. याबाबत सौमितच्या नातेवाईकांनी दुजोराही दिला आहे. त्यामुळे सौमित शहा याचा बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले असले तरी तो कसा बुडाला, नदीत पडला कसा, याचे मात्र, गूढच आहे. त्याचा हेल्प हा अखेरचा मेसेज ठरला.
गाडी सापडली फार्महाऊजवळ
साैमितची गाडी निरा नदीच्या काठाला असलेल्या एका फार्महाऊसजवळ सापडली आहे. सध्या त्याची गाडी शिरवळ पोलिसांकडे आहे. या गाडीमध्ये काही कागदपत्रेही आहेत. सोमवारी सकाळी फाॅरेन्सिक तज़्ज्ञ आणि डाॅग स्काॅडही पाचारण करण्यात येणार आहे. त्यानंतरच या प्रकरणातील आणखी वस्तुस्थिती समोर येणार आहे.