गाडी घासली अन् त्याने थेट बंदूकच काढली, सातारा जिल्ह्यातील निंबळक येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 17:50 IST2025-02-19T17:50:15+5:302025-02-19T17:50:48+5:30
फलटण ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

संग्रहित छाया
फलटण : निंबळक, ता. फलटण गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावर चारचाकी व दोनचाकी एकमेकांना घासल्याच्या कारणावरून चारचाकीतील माजी सैनिकाने बंदूक बाहेर काढून दहशत पसरविल्याची धक्कादायक घटना सोमवार, दि. १७ रोजी घडली.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी पिस्टल, एक काडतूूस व चारचाकी असा ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दत्तात्रय बाबू महारनूर (वय ४९, ऋषिकेशवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे बंदूक दाखवलेल्या माजी सैनिकाचे नाव आहे.
माजी सैनिक दत्तात्रय महारनूर हे त्यांच्या चारचाकी (एमएच १२ यूएस ९५३५) मधून पंढरपूर ते पुणे असा प्रवास करीत होते. निंबळक गावाच्या हद्दीत दुचाकी चारचाकीला घासल्याच्या कारणावरून त्यांची दुचाकीस्वार विक्रम आडके यांच्याशी शाब्दिक वाद सुरू झाला. त्यामध्ये दत्तात्रय महारनूर यांनी त्यांच्याकडील पिस्टल बाहेर काढल्याची माहिती लोकांकडून फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रसंगावधान राखून कोणताही अनुचित प्रकार व जीवितहानी होऊ न देता दत्तात्रय महारनूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्या हातातील एक पिस्टल, एक जिवंत काडतूस व चारचाकी असा ११ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.