दरे गावी मुख्यमंत्र्यांनी भरवला जनता दरबार, तापोळा भागातील गावे सहभागी; समस्या जाणल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 10:23 PM2023-04-25T22:23:45+5:302023-04-25T22:24:41+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुळगाव दरे येथे मुक्कामी असून, मंगळवारी त्यांनी जनता दरबार घेत तापोळा भागातील १०५ गावांतील समस्या जाणून घेतल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुळगाव दरे येथे मुक्कामी असून, मंगळवारी त्यांनी जनता दरबार घेत तापोळा भागातील १०५ गावांतील समस्या जाणून घेतल्या. तसेच विविध विकासकामांवरही चर्चा केली. यावेळी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव. वर्षातून ते अनेकवेळा गावी येतात. यावेळी ते तापोळा भाग, कांदाटी खोऱ्यातील विकासासाठी बैठक घेतात. आताही मुख्यमंत्री शिंदे हे तीन दिवसांच्या दाैऱ्यावर आले आहेत. दुसऱ्या दिवशी त्यांनी जनता दरबार घेतला. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दरेतील या जनता दरबारात तापोळा भागातील सुमारे १०५ गावचे ग्रामस्थ सहभागी झाले होते. यामध्ये ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यावर उपाययोजनांबाबत सूचना केली. तसेच दरे, तापोळा भाग आणि कांदाटी खोऱ्याचा विकास करण्यात येत आहे. त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
शेतीची माहिती घेतली...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शेतीत जाऊन पिके आणि फळबागांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधला, तर मुख्यमंत्री गावी आल्यानंतर शेतीत नेहमीच काम करताना दिसून येतात.