संतापजनक! जन्मदात्या मातेनेच पोटच्या गोळ्याला फेकले शेतात, माण तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 06:49 PM2022-01-19T18:49:53+5:302022-01-19T18:50:19+5:30
म्हसवड पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करून ज्वारीच्या पिकात अर्भक टाकणाऱ्या मातेचा शोध लावून तिच्यावर गुन्हाही दाखल केला.
सातारा : कोणाला न माहीत होता अर्भकाला जन्म दिल्यानंतर मातेने पोटच्या गोळ्याला ज्वारीच्या पिकात टाकून पलायन केले. मात्र म्हसवड पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करून ज्वारीच्या पिकात अर्भक टाकणाऱ्या मातेचा शोध लावून तिच्यावर गुन्हाही दाखल केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माण तालुक्यातील ढवळेवस्ती रांजणी या गावामध्ये काल, मंगळवार, १८ रोजी दुपारी ज्वारीच्या पिकामध्ये मृत अर्भक सापडले. यानंतर मसवड पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर काही तासातच या अर्भकाच्या मातेचा पोलिसांना शोध लावण्यात यश आले.
२६ वर्षीय विवाहितेला दोन मुले आहेत. असे असताना तिच्या पोटी जन्मतेवेळी मृत अवस्थेत नवजात तिसरे अर्भक जन्मले. हे अर्भक मातेने घरापासून दीडशे फुटावर असणाऱ्या ज्वारीच्या पिकात पाच दिवसांपूर्वी नेऊन टाकले. याबाबत कोणास काही एक माहिती न देता गुप्तपणे या अर्भकाची तिने विल्हेवाट लावली.
तसेच अर्भक जन्मल्याची माहिती तिने लपवून ठेवली. अद्यापपर्यंत पोलिसांनी संबंधित मातेला अटक केली नव्हती. याबाबत अधिक तपास पोलीस नाईक डीपी खाडे हे करत आहेत.