फ्लेक्स, होर्डिंग उतरले अन् साताऱ्याचे रूप बदलले!, नागरिकांमध्ये समाधान

By सचिन काकडे | Published: June 1, 2024 12:41 PM2024-06-01T12:41:56+5:302024-06-01T12:42:08+5:30

पालिकेची कारवाई जोरात : आठ दिवसांत पंधरा होर्डिंग्ज जप्त; नागरिकांमध्ये समाधान

The city of Satara became clean by removing the unauthorized flex and hoardings | फ्लेक्स, होर्डिंग उतरले अन् साताऱ्याचे रूप बदलले!, नागरिकांमध्ये समाधान

फ्लेक्स, होर्डिंग उतरले अन् साताऱ्याचे रूप बदलले!, नागरिकांमध्ये समाधान

सातारा : सातारा शहराला लागलेले अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंगचे ग्रहण आता सुटू लागले असून, हे शहर कित्येक वर्षांनंतर मोकळा श्वास घेऊ लागले आहे. शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांचे बदललेले हे रूप पाहून सातारकरांमधूनही पालिकेचे कौतुक होत आहे.

सातारा शहर स्वच्छ व सुंदर आहेच; परंतु या शहरात पाऊल ठेवले की मोठ-मोठे फ्लेक्स अन् होर्डिंग नजरेस पडायचे. पालिकेकडून नो फ्लेक्स झोन जाहीर करूनही त्याचा फ्लेक्स व होर्डिंगधारकांवर फारसा प्रभाव झाला नव्हता. पालिकेच्या कारवाईला न जुमानता शहरातील प्रमुख चौक, रस्ते तसेच इमारतींवर फ्लेक्स व होर्डिंग उभारले जात होते. अलीकडच्या दीड-दोन वर्षांत वर्षांत हे प्रमाण इतके वाढले की संपूर्ण शहर फ्लेक्स व होर्डिंगच्या आड गुडूप होऊन गेले.

मात्र, घाटकोपर दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीनंतर संपूर्ण राज्यातील होर्डिंग व फ्लेक्सचा विषय चर्चेचा ठरला. सातारा जिल्हा प्रशासनानेदेखील होर्डिंगचा विषय गांभीर्याने घेत अनधिकृत होर्डिंग हटविण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले. सातारा पालिका प्रशासनाने आठ दिवसांपासून कारवाईस प्रारंभ केला असून, आतापर्यंत पंधराहून अधिक अनधिकृत होर्डिंग व शेकडो फ्लेक्स मुळासकट काढून टाकले आहेत. फ्लेक्स व होर्डिंगची गर्दी कमी होऊ लागल्याने या शहराचे रूपही आता हळूहळू बदलू लागले आहे.

खांद्यावरील ओझे हलके

सातारा शहरातील इमारती व सार्वजनिक रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून फ्लेक्स व होर्डिंगचा भार सहन करत आले आहेत. खांद्यावरील हे ओझे उतरू लागल्याने इमारती, रस्ते व दुकानांनाही आता हलके-हलके वाटू लागले आहे. हा बदल पाहून परगावातून साताऱ्यात येणाऱ्या शेतकरी व नोकदरांनाही सुखद धक्का बसत आहे.

पालिकेने सातत्य ठेवावे..

घाटकोपर येथील घटना दुर्दैवीच आहे. मात्र, या घटनेनंतर प्रशासनाने कारवाईचे ठोस पाऊल उचलल्याने त्याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत. सातारा शहराला राजधानीचा मान मिळाला आहे. त्यामुळे या शहराचे विद्रुपीकरण होईल असे कृत्य कोणीही करू नये. पालिका प्रशासनाने सुरू केलेली ही कारवाई योग्यच असून, यात सातत्य ठेवायला हवे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

असे हटविले होर्डिंग

  • कूपर कॉलनी - ०६
  • गोडोली - ०२
  • राजवाडा बसस्थानक - ०३
  • नगरवाचनालय - ०३
  • मोती चौक - ०१

Web Title: The city of Satara became clean by removing the unauthorized flex and hoardings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.