दाम्पत्याला घरातून उचलंल;घर नावावर होण्याचं पोलिसांमुळे टळलं, साताऱ्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 09:46 PM2022-02-17T21:46:23+5:302022-02-17T22:00:55+5:30
- दत्ता यादव सातारा : खासगी सावकारांच्या छळाचे अनेक प्रकार समोर येत आहेत. एका दाम्पत्याचे खासगी सावकाराने घरातून अपहरण ...
- दत्ता यादव
सातारा : खासगी सावकारांच्या छळाचे अनेक प्रकार समोर येत आहेत. एका दाम्पत्याचे खासगी सावकाराने घरातून अपहरण केलं. कशासाठी तर घर नावावर करून देण्यासाठी. पण पोलीस वेळेत पोहोचल्याने खासगी सावकाराच्या नावावर घर होण्याचे टळले. अवघ्या पन्नास हजारांसाठी सावकारानं संबंधित दाम्पत्याला आयुष्यातून बेघर केलं असतं.
कोरोनाचा शिरकाव होण्याच्या एक वर्षे अगोदर संबंधित दाम्पत्याने एका ठिकाणी छोटंस हाॅटेल सुरू केलं. यासाठी एका खासगी सावकाराकडून त्यांनी ५० हजार रुपये १० टक्के व्याजाने घेतले. महिन्याला नियमित हप्तेही सुरू झाले. पण सात महिने उत्तमरीत्या चाललेला व्यवसाय कोरोनाच्या शिरकाव्याने अचानक बंद पडला. परिणामी सावकाराला महिन्याकाठी जाणारे हप्ते बंद झाले. यामुळे सावकार चिडला. तुझं हाॅटेल बंद असलं तरी मला त्याच देणं घेणं नाही. महिन्याला मला व्याजासह रक्कम पाहिजे म्हणजी पाहिजे, अशी तंबी तो देऊ लागला.
सलग लाॅकडाऊनमुळे त्या दाम्पत्याच्या हाॅटेल व्यवसायाची घडी पूर्णपणे विस्कटली होती. आता तर त्याला महिन्याचेही हप्ते देणे त्या दाम्पत्याला हप्ते देणे शक्य होत नव्हतं. तेव्हा एके दिवशी सकाळी-सकाळी खासगी सावकार दोन व्यक्तींना सोबत घेऊन त्यांच्या घरी पोहोचला. तुम्ही मला पैसे तरी द्या नाहीत तर तुमचे घर नावावर करून द्या, त्या शिवाय मी इथून उठणार नाही, अशी भूमिका त्याने घेतली. दुपारी एकपर्यंत तो सावकार त्यांच्या घरात ठाण मांडून बसला होता. सरतेशेवटी त्या दाम्पत्याचे त्यानं अपहरण करून एका गावात नेलं. आता इथून आपण सातारला जाऊ. साताऱ्यात निबंधकांकडे गेल्यानंतर तुमचं घर माझ्या नावावर करून द्यायचं, अशी तो तंबी देऊ लागला.
यादरम्यान, त्या व्यावसायिकाची पत्नी लघुशंकेचा बहाणा करून घरातून बाहेर आली. त्यानंतर तिने काही ओळखीच्या लोकांना मोबाइलवर या सावकाराची कहाणी सांगितली. त्यानंतर मात्र, त्यांच्या ओळखीच्या लोकांनी वेगाने सूत्रे हलवली. पोलिसांना कळविण्यात आलं. घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने पोलिसांनीही संबंधित गावात जाऊन खासगी सावकाराच्या तावडीतून त्या व्यावसायिकांची सुटका केली आणि सावकाराला बेड्या ठोकल्या.जर का त्या व्यावसायिकाच्या पत्नीने सतर्कता दाखवून ओळखीच्या लोकांना फोन केला नसता तर त्यांच घर खासगी सावकराच्या घशात नक्कीच गेलं असतं.
डायरीत कहाणी मात्र वेगळी...
खर तर इथ संबंधित खासगी सावकारावर अपहरणाचाही गुन्हा दाखल होणे गरजेचे होतं. परंतु पोलीस तक्रार नोंदवून घेताना अशा गोष्टीला महत्त्व देत नसल्याचे अनेक घटनांतून समोर येते. केवळ खासगी सावकारीचे कलम लावून पोलीस मोकळे होतात. पण या पैशाच्या कारणाने झालेला मानिसक छळ पीडितांना नाउमेद करतोय.