सातारा जिल्ह्यात जोर'धार'; कृष्णा नदीवरील बंधारा गेला वाहून, किल्ले अजिंक्यताराच्या प्रवेशद्वारासमोर दरड कोसळली

By दीपक शिंदे | Published: July 24, 2024 12:30 PM2024-07-24T12:30:26+5:302024-07-24T12:54:45+5:30

पाटण तालुक्यात रस्ता खचला, वाहतुकीवर परिणाम; प्रशासन सतर्क

The dam on the Krishna river was washed away; Many villages in Satara district lost connectivity due to heavy rains | सातारा जिल्ह्यात जोर'धार'; कृष्णा नदीवरील बंधारा गेला वाहून, किल्ले अजिंक्यताराच्या प्रवेशद्वारासमोर दरड कोसळली

सातारा जिल्ह्यात जोर'धार'; कृष्णा नदीवरील बंधारा गेला वाहून, किल्ले अजिंक्यताराच्या प्रवेशद्वारासमोर दरड कोसळली

सातारा : सातारा शहरात पावसाची संततधार असून किल्ले अजिंक्यताराच्या प्रवेशद्वारासमोर दरड कोसळली आहे. तर कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने कऱ्हाड तालुक्यात एका बंधाऱ्याला भगदाड पडले. त्यामुळे काही भाग वाहून गेला आहे. त्याचबरोबर पाटण तालुक्यात रस्ता खचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पावसामुळे सतत घटना घडत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

सातारा शहरात बुधवारी पहाटेपासून पावसाची संततधार आहे. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. शहराला लागूनच अजिंक्यतारा किल्ला आहे. या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच सकाळच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे मार्गावर दगड पडले आहेत. नगरपालिकेने दरड हटविण्यासाठी जेसीबी पाठविला आहे. 

त्याचबरोबर जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस होत असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. दरम्यान, भुयाचीवाडी, ता. कऱ्हाड येथे कृष्णा नदीवरील बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेला. याबाबत जलसंपदा विभागाने तत्काळ आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. तर प्रशासनाने परिसरातील नागरिकांना खबरदारीची सूचना केली आहे. धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आलेले आहे. 

कामरगाव, ता. पाटण येथील पाबळ नाल्याजवळ कोयना-नवजा रस्ता खचला आहे. यामुळे पाटण तहसीलदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन उपाययोजना करण्याबाबत सूचना केली आहे.

Web Title: The dam on the Krishna river was washed away; Many villages in Satara district lost connectivity due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.